जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे ८५० जणांमागे एक पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:24 IST2021-02-20T05:24:06+5:302021-02-20T05:24:06+5:30

चंद्रपूर : सामाजिक स्वास्थ्य सुरळीत राखण्यासाठी पोलीसदादा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र सद्य:स्थितीत हाच पोलीसदादा तणावात असल्याचे दिसून येत ...

A policeman behind 850 security personnel in the district | जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे ८५० जणांमागे एक पोलीस

जिल्ह्यातील सुरक्षा रामभरोसे ८५० जणांमागे एक पोलीस

चंद्रपूर : सामाजिक स्वास्थ्य सुरळीत राखण्यासाठी पोलीसदादा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र सद्य:स्थितीत हाच पोलीसदादा तणावात असल्याचे दिसून येत आहे. २५ लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची धुरा केवळ १९४ पोलीस अधिकारी व २ हजार ७१५ पोलीस सांभाळत आहेत. त्यामुळे शांतता व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.

सामाजिक सुरक्षेसाठी पोलीस विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कोणत्याही सण-उत्सवात हा विभाग शहराच्या शांततेसाठी प्रयत्नरत असतो. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कर्मचाऱ्यांचा ताण वाढत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. दारुबंदी झाल्यापासून पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात पोलिसांची भरती करण्यात आली नाही. परिणामी २५ लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात केवळ १९४ पोलीस अधिकारी तर २७१५ पोलीस कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यात पोलीस शिपायांची ११३ तर काही अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलीसदादा आणि लोकसंख्येच्या आकडेवारी केल्यास ८५० लोकांमागे केवळ एक पोलीस कर्तव्यावर असल्याचे स्पष्ट होते.

बॉक्स

पोलिसांवर कामाचा ताण

चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे २७१५ पोलीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. कॉन्स्टेबलची ११३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलीस स्टेशनमधील दैनंदिन काम, मोर्चा, राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका, दौरा, कोरोना ड्युटी, गुन्ह्यांचा तपास आदी कर्तव्य बजावताना मोठी दमछाक करावी लागते. त्यामुळे पोलिसांची रिक्त पदे त्वरित भरणे गरजेचे आहे.

बॉक्स

वाढत्या गुन्ह्यांचे पोलिसांपुढे आव्हान

सन २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्रीला उधाण आले. त्यानंतर ड्रग्ज, गांजा आदी पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. तसेच चोरी, मारहाण, हत्या आदींचेही प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांच्या घटनांतही प्रचंड वाढ होत आहे. या सर्वांवर आळा घालण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Web Title: A policeman behind 850 security personnel in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.