पोलीस सज्जनांना मित्र वाटावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 01:13 IST2016-12-26T01:13:19+5:302016-12-26T01:13:19+5:30
पोलीस विभाग अत्याधुनिक यंत्रणांव्दारे सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

पोलीस सज्जनांना मित्र वाटावा
पालकमंत्री : दुर्गापूर पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन
चंद्रपूर : पोलीस विभाग अत्याधुनिक यंत्रणांव्दारे सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरु आहे. पोलिसामुळेच सामान्य माणूस सुरक्षित आहेत. सज्जन माणसांना पोलीस आपला मित्र वाटावा इतके चांगले काम पोलिसांचे असले पाहिजे. यासोबतच वाईट प्रवृत्तींना ठेचण्याची भूमिकाही या विभागाने बजावली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दुगार्पूर पोलिस स्टेशनच्या नव्याने मंजूर झालेल्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, जयचंद काठे, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अमन मित्तल, ऊर्जानगरच्या सरपंचा लिना चिमूरकर आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्याने सर्वप्रथम सायबर लॅब सुरु केली होती. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात लॅब सुरु करण्यात आली. पोलिसांना चांगली घरे दिली जात असून जनतेची सेवा करणाऱ्याला उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी इमारतीच्या नियोजित जागेचे भूमिपूजन केले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी पोलीस विभागासाठी मंजूर व सुरु कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार एपीआय विकास मुंढे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)