पोलीसच झाले गुंडाचे मुखबीर

By Admin | Updated: May 7, 2015 00:56 IST2015-05-07T00:56:34+5:302015-05-07T00:56:34+5:30

कुख्यात गुंड शेख हाजी सरवर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. मंगळवारी दुपारी या पथकाने त्याला नकोडा परिसरातून ताब्यात घेतले.

The police went to the gangster's face | पोलीसच झाले गुंडाचे मुखबीर

पोलीसच झाले गुंडाचे मुखबीर

चंद्रपूर : कुख्यात गुंड शेख हाजी सरवर अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. मंगळवारी दुपारी या पथकाने त्याला नकोडा परिसरातून ताब्यात घेतले. मात्र या अटकेनंतर पोलीस खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचा काळा चेहरा मात्र समोर आला आहे. अटकेनंतर आपल्या यंत्रणेतील काही पोलीस अधिकारी आणि शिपायांबद्दलचा खळबळजनक खुलासा पोलीस अधिक्षकांच्या हाती लागला आहे.
हाजीच्या मागावर मागील अनेक महिन्यांपासून एलसीबी पथक होते. मात्र त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती असतानासुद्धा पथक पोहचण्यापूर्वीच हाजी तेथून पसार होण्यात यशस्वी होत होता. यामुळे पोलिसापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक दिवस लोटूनही तो हाती लागत नसल्याने पोलिसांवरचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. याच काळात शेख हाजी घुग्घुसजवळील नकोडा येथे आल्याची माहिती एलसीबीच्या हाती लागली.
मात्र यापूर्वीचा अनुभव लक्षात येऊन एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रभाकर टिक्कस यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजीव जैन यांच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी या मोहिमेत कुणालाही सहभागी न करता केवळ स्थानिक गुन्हे शाखेवर ही कामगिरी सोपविली. या शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांच्यासह निवडक शिपायांना घेऊन सापळा रचला. हाजीला नकोडा परिसरातून अलगदपणे पकडण्यात यश आले.
अटकेनंतर त्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोर हजर करण्यात आले. त्याच्याकडून घेतलेल्या कबुलीजबाबात मात्र खबळजनक माहिती पुढे आली. आपल्या विरूद्ध सुरू असलेल्या पोलिसाच्या प्रत्येक हालचालीची माहिती आपणास काही पोलीसच पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा त्याने अधीक्षकांसमक्ष केला. यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तीन गुन्ह्यात होता फरार !
हाजी तीन गुन्ह्यांमध्ये फरार होता. घुग्घुसमध्ये सैयद इस्त्राईलच्या वाहनावर ३ मे २०१४ मध्ये त्याने गोळीबार केला होता. त्यानंतर अक्षय येरूळकर याचे अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. या सोबतच खंडणीचेही गुन्हे त्याच्यावर आहेत. या तिन्ही प्रकरणात तो फरार होता. बुधवारी पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले असता त्याला ९ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
तडकाफडकी बदल्या
हाजीकडून मिळालेल्या माहितीनंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी काल मंगळवारी रात्रीच सातही पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. बुधवारी ते सर्वजण नव्या ठिकाणी रूजू झाले आहेत. दोघांना पोलीस मुख्यालयात देण्यात आले असून इतरांना जिवती पहाडावरील ठाण्यात पाठविले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कोण हा हाजी शेख ?
हाजी शेख हा हत्या, खंडणी, कोळसा चोरी अशा अनेक प्रकरणात फरार आरोपी होता. त्याचे घुग्घुस परिसरात दहशतीचे मोठे साम्राज्य आहे. त्याच्यावर चंद्रपूरसह वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २३ गुन्हे दाखल असून पहिल्या गुन्ह्याची नोंद २००३ मध्ये घुग्घुस पोलिसात आहे. २००५ मध्ये दरोडा, खंडणीचे तीन गुन्हे, जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे आणि खुनाचे दोन गुन्हे त्याच्यावर आहेत. अलिकडच्या काळातील तीन गुन्ह्यात हाजी फरार होता. गडचांदूरमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या घरावर त्याच्या गँगने गोळीबार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.
मागील अनेक दिवसांपासून हाजीला अटक करण्याच्या मोहिमा आखल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळी तो चकमा देऊन पसार होत होता. यावेळी मात्र एलसीबीच्या पथकाने उत्तम कामगिरी केली आहे. हाजीच्या अटकेनंतर आपल्या खात्यातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे हाजीच्या बयानातून आली आहेत. त्यामुळे या सर्वांच्या तात्काळ प्रभावाने बदल्या केल्या आहेत. या सर्वांची कठोर चौकशी करण्याचे आदेश आपण काढले असून स्वत:च्या निगराणीत चौकशी करणार आहोत. घुग्घुसला येत्या एक-दोन दिवसात नवीन ठाणेदार दिला जाईल.
-डॉ. राजीव जैन
जिल्हा पोलीस अधिक्षक
हाजी म्हणाला, पोलीसच सांगत होते ठावठिकाणा...
हाजीने अटकेनंतर पोलिसांपुढे दिलेला कबुलीजबाब अत्यंत गंभीर आहे. पोलीसच आपणास कारवाईचा ठावठिकाणा सांगत होते, त्या बदल्यात आपण त्यांना आर्थिक मदत करीत होतो, या त्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून त्याचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र ते पोहचण्यापूर्वीच तो पसार होत असे. काही दिवसांपूर्वी तो मुलीच्या वाढदिवसासाठी घुग्घुसला आला असल्याची खात्रिलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या लागली होती. पण पोलीस पोहचण्यापूर्वीच हाजी तेथून पसार झाला होता. भद्रावती येथील एका प्रकरणात तो आल्याची माहिती पोलिसांना लागली होती. मात्र पोलीस पोहचताच तो आपली कार सोडून पसार झाला. नेमक्या पोलिसांच्या हालचालींची पूर्ण माहिती त्याच्यापर्यंत कशी पोहचत असावी, याचे पोलीस अधिकाऱ्यांनाही आश्चर्य होते. मात्र त्याचा अटकेनंतर त्याने दिलेल्या बयानातून या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस अधिक्षकांना मिळाली आहेत. हाजीला मदत करणाऱ्यांमध्ये घुग्घुसचे विद्यमान ठाणेदार, चंद्रपूर शहर ठाण्यातील डीबी पथकातील एक एएसआय, एलसीबी पथकातील दोन कर्मचारी, घुग्घुस पोलीस ठाण्याच्या डीबी पथकातील एक कर्मचारी आणि अन्य दोन कर्मचाऱ्यांची नावे हाजीने घेतली आहेत. माहिती पुरविण्याच्या मोबदल्यात आपण या सर्वाना वेळोवेळी आर्थिक मदत करीत असल्याचा खळबळजनक खुलासाही हाजीने केल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे.

Web Title: The police went to the gangster's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.