पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलिसांची सभा
By Admin | Updated: February 23, 2015 01:19 IST2015-02-23T01:19:51+5:302015-02-23T01:19:51+5:30
चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये येथील पोलीस कर्मचारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांच्यासोबत ...

पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलिसांची सभा
बल्लारपूर: चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये येथील पोलीस कर्मचारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांच्यासोबत शुक्रवारी एक विशेष सभा घेतली. तदवतच त्यांच्या समस्या ऐकून त्यांच्या समाधानार्थ लगेचच निर्णय घेऊन त्यांना समाधानही दिले.
यावेळी बल्लारपूर पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षणहीे केले. या दरम्यान त्यांनी मार्गदर्शनही केले. यावेळी राजीव जैन म्हणाले, सामान्य लोकांच्या तक्रारी गंभीरपणे ऐकून घेऊन त्यानुरुप कारवाई करुन त्यांना दिलासा द्यावा आणि पोलीस हे नागरिकांचे रक्षक आणि बंधू आहेत. ही भावना आपल्या कर्तव्यमुल्यातून तयार करा. याप्रसंगी बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक नरुमणी तांडी व इतर अधिकारी गण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जैन यांनी कर्मचाऱ्यांना बोलते करुन त्यांच्या समस्याही ऐकल्यात. या भेटीत जैन यांनी येथील कार्याचे निरीक्षण केले. झालेले गुन्हे, त्याचा तपास त्यातून निघालेल्या परिणाम, याची माहिती त्यांनी घेतली.
चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडले गेलेत व चोरी गेलेला ८० टक्के माल वसूल झाल्याचे ठाणेदार तांडी यांनी सांगितले. या शहरातील बंद तीन पोलीस चौकी परत सुरु करण्यात आल्या आहेत. अधीक्षकांनी या भेटीत तीन चौकी, पोलीस स्टेशन या ठिकाणी पाच टीव्ही देत असल्याचे सांगितले. बल्लारपूर पोलीस स्टेशन अंतर्गत २०१३ ला २९३ गुन्हे घडले होते, २०१४ मध्ये त्यात घट झाली आहे. गुन्हे घडूच नये याकरिता सतर्क, सजग राहा, असा सल्ला पोलीस कर्मचाऱ्यांना जैन यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)