पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सांगता
By Admin | Updated: March 23, 2015 01:16 IST2015-03-23T01:16:11+5:302015-03-23T01:16:11+5:30
येथील पोलीस मुख्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम शनिवारी पार पडला.

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सांगता
चंद्रपूर : येथील पोलीस मुख्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचा समारोपीय कार्यक्रम शनिवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले होत्या. यावेळी संयोजक तथा जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलिल, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सरीता कुडे, महिला व बालकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी संगीता भांगरे, प्रकल्प सहाय्यक येरमे, पोलीस उपअधीक्षक (गृह) स्वप्नील धुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मांडवकर, तामटे, डांगे, कल्याणी हुमणे, रघुनाथ चौधरी राखीव पोलीस निरीक्षक तसेच सर्व प्रशिक्षक आणि एकुण ६९३ प्रशिक्षणार्थी मुली उपस्थित होत्या.
सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात १० टक्के जिल्हा परिषद सेस फंड व आदिवासी उपयोजनाअंतर्गत प्राप्त तरतुदीनुसार जिल्हा महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर आणि जिल्हा पोलीस दल चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी प्रवर्गाचे ४१६ मुली आणि ग्रामीण भागातील इतर प्रवर्गातील २७७ मुली असून एकूण ६९३ मुलींना चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय व बल्लारशा, कोठारी, गोंडपिपरी, राजुरा, धाबा, विरूर, सिंदेवाही, वरोरा, उमरी पोतदार, पोंभुर्णा, मूल, कोरपना, भद्रावती, शेगाव, माजरी भिसी येथील पोलीस ठाण्यात भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण देण्यात आले.
संचालन महिला पोलीस शिपाई प्रज्ञा झाडे यांनी केले तर आभार स्वप्निल धुळे, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय चंद्रपूर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी व पोलीस मुख्यालयातील चंद्रपूर पथकाने प्रयत्न केले. (प्रतिनिधी)