अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र
By Admin | Updated: April 10, 2015 00:51 IST2015-04-10T00:51:06+5:302015-04-10T00:51:06+5:30
जिल्ह्यात दारूबंदी होताच अवैध दारूविक्रीविरूद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे.

अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचे धाडसत्र
बल्लारपूर/मूल/घुग्घूस : जिल्ह्यात दारूबंदी होताच अवैध दारूविक्रीविरूद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. जिल्हाभरात पोलिसांची कारवाई सुरू असून मूल पोलिसांनी २२ हजाराची तर बल्लारपूर येथे दीड लाखाची व घुग्घुस येथे ५७ हजार रूपयाची दारू जप्त केली. ही कारवाई गुरूवारी करण्यात आली.
मूल पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मूल येथील सरदार मोहल्यातील लंजू सोमसिंग पटवा या महिलेच्या घरी पोलीस विभागाच्या पथकाने धाड टाकली. घराची झडती घेतली असता, जमिनीमध्ये खड्डा खोदून दारूच्या निपा लपवून ठेवण्यात आल्या होत्या. २२ हजाराची विदेशी दारू जप्त करून महिलेला अटक करण्यात आली.
तर बल्लारपूर येथे विद्यानगर वॉर्डातील एका घरी पोलिसांनी धाड टाकून दीड लाखांची दारू जप्त केली. पवन विजय जयस्वाल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे धाड टाकून चौकशी केली असता, स्लॉपवर पाण्याच्या टाकीत दारूसाठा लपवून ठेवलेला आढळला. यात १४४० बॉटल्स् होत्या. दारूसाठा जप्त करून दारूविक्रेत्याला अटक करण्यात आली. घुग्घुस येथे शेतातील घरी धाड टाकून ५७ हजाराची दारू जप्त करण्यात आली. यात बाबुराव वारलू थेरकर याला अटक करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)