‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 00:37 IST2017-01-18T00:37:30+5:302017-01-18T00:37:30+5:30
येथे कार्यरत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने एका विधवा महिलेच्या मुलास त्याच्या आईविषयी आपत्तीजनक वक्तव्य केले.

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भद्रावती येथील घटना : आईबद्दल आपत्तीजनक वक्तव्य भोवले
भद्रावती : येथे कार्यरत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने एका विधवा महिलेच्या मुलास त्याच्या आईविषयी आपत्तीजनक वक्तव्य केले. त्यामुळे चिडून जावून त्या मुलाने पोलीस ठाण्यासमोरच सहाय्यक उपनिरीक्षकांची यथेच्छ धुलाई केल्याचा प्रकार सोमवारी घडला होता. याबाबत मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘त्या’ सहायक पोलीस उपनिरीक्षकाची जिवती तालुक्यातील वणी कॅम्प येथे तडकाफडकी बदली केल्याची माहिती ठाणेदारांनी दिली.
येथील सहायक उपनिरीक्षक सुरेश आघाडे यांनी १५ जानेवारीला सकाळी ९ वाजता येथीलच भाजी विक्री करणाऱ्या विधवा महिलेचा मुलगा वैभव बेले याच्याशी मोटरसायकलवरून वाद घालून त्याच्या आईबद्दल आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे वैभव बेले यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यास पोलीस ठाण्यासमोर चांगलेच चोपले. या व्यतिरिक्त आघाडे या अधिकाऱ्याच्या विरोधात काही तक्रारी असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले होते. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवून आघाडे याची जिवती तालुक्यातील वणी कॅम्प येथे तडकाफडकी बदली केली असल्याचे येथील ठाणेदार विलास निकम यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)