गोंडपिपरीच्या रहिवासी झाल्या चेकबोरगावच्या पोलीस पाटील

By Admin | Updated: June 26, 2016 00:39 IST2016-06-26T00:39:33+5:302016-06-26T00:39:33+5:30

किरण भारत झाडे या मागील १५ वर्षापासून चेकबोरगावच्या पोलीस पाटील आहेत.

Police force from Checkborggaon, resident of Gondipipari resident | गोंडपिपरीच्या रहिवासी झाल्या चेकबोरगावच्या पोलीस पाटील

गोंडपिपरीच्या रहिवासी झाल्या चेकबोरगावच्या पोलीस पाटील

दुसऱ्यांची नियुक्ती करा : १५ वर्षांपासून बाहेरगावातून कारभार
गोंडपिपरी : किरण भारत झाडे या मागील १५ वर्षापासून चेकबोरगावच्या पोलीस पाटील आहेत. पण १५ वर्षापासून त्या गोंडपिपरीत वास्तव्य करीत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी वाढत असून प्रशासकीय कामाकरिता त्या न्याय देऊ शकत नसल्याने त्यांच्या ऐवजी गावात वास्तव्य करणाऱ्याची पोलीस पाटील पदी निवड करावी, अशी मागणी चेकबोरगाव येथील नागरिकांनी पत्रपरिषदेतून केली आहे.
१५ वर्ष गावाबाहेर राहून पदावर कायम असणाऱ्या किरण झाडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील चेकबोरगाव येथे किरण भारत झाडे यांची पोलीस पाटीलपदी १५ वर्षापूर्वी नियुक्ती करण्यात आली. याच दरम्यान त्यांचे कुटुंबीय गोंडपिपरी येथे स्थायिक झाले. किरण झाडे यांचे पती भारत झाडे यांचा गोंडपिपरीत धान खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या १५ वर्षांपासून किरण झाडे या गोंडपिपरीतच असतात. गोंडपिपरीत राहून त्या चेकबोरगावचे पोलीस पाटील पद सांभाळत आहेत. गावातील कुणाचेही काम असले की त्यांना गोंडपिपरीला यावे लागते. यामुळे गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या दोन वर्षापासून गावकऱ्यांनी या प्रकाराची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. अनेकदा स्मरणपत्रदेखील लिहिले. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. मागील काळात बाहेरगावातून कारभार सांभाळणाऱ्या झाडे यांना पदावरुन हटविण्याचा ग्रामपंचायतीचा ठरावदेखील घेण्यात आला. सातत्याने प्रफासनापुढे हा गंभीर प्रकार मांडण्यात आला. मात्र याकडे पुरते दुर्लक्ष करण्यात आल्याने हा प्रश्न जैसे थे आहे. गावात पोलीस पाटील राहत नसल्याने गौण खनिजाची चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी गावात आले असता पोलीस उपस्थित राहत नसल्याचा प्रकार अनेकदा घडला आहे. मात्र असे असताना किरण झाडे यांच्यावर प्रशासनाची मेहरबानी कशासाठी, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. गावात कर्तव्य बजावत नसतानासुद्धा झाडे नियमितपणे मानधन घेत आहेत. गावात प्रशासकीय कार्यक्रमातही त्या कधीही सहभागी झाल्या नाहीत. अशा परिस्थितीत संबंधित महिलेकडे पोलीस पाटीलसारख्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी ठेवणे गावविकासाच्या दृष्टीने हिताचे नसल्याचे मत गावकऱ्यांनी पत्रपरिषदेतून व्यक्त केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Police force from Checkborggaon, resident of Gondipipari resident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.