दोन्ही गटांची एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार

By Admin | Updated: June 29, 2016 00:59 IST2016-06-29T00:59:05+5:302016-06-29T00:59:05+5:30

येथील कॉलरी वॉर्डात सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात

The police complaint against both groups | दोन्ही गटांची एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार

दोन्ही गटांची एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार

हाणामारी प्रकरण : जखमीवर नागपूर, चंद्रपूर येथे उपचार सुरु
वरोरा : येथील कॉलरी वॉर्डात सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात प्रवीण घनश्याम पारखी (२४) या युवकावर सब्बलीने वार करुन ठार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याचे प्राण वाचले. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील ट्रामा केयर मध्ये उपचार सुरुअसून प्रकृती चिंताजनक आहे. तर दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
ढोबळे परिवार कॉलरी वॉर्डातील रहिवासी असून त्यांनी काही दिवसांपूर्वी घराचे बांधकाम सुरु केले होते. राहायला दुसरी जागा नसल्याने कल्याणेश्वर हनुमान मंदिर कमिटीकडे काही दिवसासाठी तात्त्पुरती जागा देण्याची विनंती केल्याने मंदिर कमिटीने त्यांना जागा दिली. पण काही दिवसातच ढोबळे यांनी मंदिर परिसरात अवैध दारू विक्री सुरु केल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली. या विरोधात वॉर्डातील महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, त्यावरुन गुन्हाही दाखल झाला होता. पण तुम्ही तक्रार का दिली, यावरुन ते नेहमी महिलांना शिवीगाळ करत होते.
त्यांना राहायला जागा दिली की, दारू विकायला, असा जाब महिलांनी मंदिर कमिटीला विचारला असता कमिटने जागा रिकामी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरुन वादही झाला होता. त्यामुळे नेहमी वादावादी सुरु होती. २७ जूनला वॉर्डातील एकाचे वणी येथे लग्न असल्याने वॉर्डातील युवक समारंभासाठी गेले होते. तेथे प्रशांत साळवे व सचिन ढोबळे यांच्यात भांडण झाले. त्यात काहीनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. मात्र, सायंकाळी परतल्यावर वणीला भांडण का केले, हा जाब विचारायला प्रशांत साळवे हा सचिन ढोबळे यांच्या घरी गेला असता, त्याच्यावर सब्बलीने प्राणघातक हल्ला झाला.
प्रविण जखमी झाल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात, त्यानंतर नागपूरच्या मेडीकल कॉलेजमधील ट्राम केयर मध्ये दाखल करण्यात आली. तो सध्या ट्रामा केयर मधील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. त्याच्या डाव्या हाताची दोन बोटेही तुटली आहेत. लता बबन ढोबळे (४५), बबन विठ्ठल ढोबळे यांनाही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रशांत वासुदेव साळवे (२४), संतोष सज्जनपवार (२७), सचिन बबन ढोबळे (२९), विकास बबन ढोबळे (२५) हे सर्व कॉलरी वॉर्डातील रहिवासी असून किरकोळ जखमी आहेत. संतोष पवार यांच्या तक्रारीवरुन सचिन ढोबळे, बबन ढोबळे, लता ढोबळे, विकास ढोबळे यांच्यावर तर, सचिन ढोबळे यांच्या तक्रारीवरुन प्रशांत वासुदेव साळवे, संतोष सज्जनपवार, प्रवीण पारखी, राकेश शंभरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)


एसडीपीओंनी केली घटनास्थळाची पाहणी
वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वॉर्डातील तणाव बघता पाच पोलीस कर्मचाऱ्यांना परिसरात रात्रपाळीत बंदोबस्तावर लावण्यात आले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे पोलीस निरीक्षकांना आदेश दिले आहे. मंगळवारी सकाळी पुन्हा घटनास्थळाची दुसऱ्यांदा पाहणी करुन पंचनामा केला व भांडणात वापरण्यात आलेले शस्त्र जप्त केले.

Web Title: The police complaint against both groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.