मृतदेहासह पोलीस चौकीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:30 IST2018-01-28T23:29:36+5:302018-01-28T23:30:21+5:30
अपघातात जखमी महिलेचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. पण आरोपीवर पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे व वाहन ताब्यात घेताना हेराफेरी केल्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन शंकरपूर पोलीस चौकीवर धडकले.

मृतदेहासह पोलीस चौकीवर धडक
आॅनलाईन लोकमत
शंकरपूर : अपघातात जखमी महिलेचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. पण आरोपीवर पोलिसांकडून योग्य कारवाई न झाल्यामुळे व वाहन ताब्यात घेताना हेराफेरी केल्यामुळे संतप्त झालेले नातेवाईक मृतदेह घेऊन शंकरपूर पोलीस चौकीवर धडकले. जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही, तोपर्यंत प्रेत न उचलण्याचा निर्णय घेतल्याने पोलीस विभागाची चांगली तारांबळ उडाल्याची घटना रविवारी घडला.
अखेर पोलीस उपअधीक्षक यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य केल्यानंतर चार तासानंतर प्रेत उचलण्यात आले. २२ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता पार्वती कवडू चौधरी (६५) ही महिला भाजीपाला विकून घरी जात असताना भवानी चौकात भरधाव येणाºया दुचाकी वाहनाची त्यांना धडक बसली. सदर दुचाकी वाहन मनोज मेश्राम चालवित होता, त्याच्यासोबत दुसरा एक व्यक्ती बसला होता.
जखमी महिलेला तत्काळ शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. मात्र रविवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास पार्वती चौधरी यांचा मृत्यू झाला. मात्र आरोपीवर योग्य कारवाई न झाल्याने महिलेचे प्रेत शवविच्छेदनानंतर थेट पोलीस चौकीत आणण्यात आले.
आरोपीवर योग्य कारवाई न करता अपघातातील वाहनाची हेराफेरी केली. वेळोवेळी चुकीची माहिती पोलीस विभागाने नातेवाईकांना दिल्याचा आरोप माना समाजाच्या नेत्यांनी केला. चार तास नातेवाईकांनी पोलीस चौकीत ठिय्या केल्यानंतर शिष्टमंडळाशी पोलीस उपअधीक्षक परदेशी यांनी चर्चा केली. त्यानंतर नातेवाईकांनी प्रेत उचलले. यावेळी जि.प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर यांनी मृताच्या कुटुंबीयांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.
चार पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली
या प्रकरणात कारवाईत कसूर केल्याप्रकरणी शंकरपूर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सोनकुसरे, पठाण, चाफले व नंदूरकर यांची तडाफडकी बदलीचे आदेश काढण्यात आले आहे.