उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५२ जणांवर पोलीस कारवाई

By Admin | Updated: December 22, 2016 01:44 IST2016-12-22T01:44:39+5:302016-12-22T01:44:39+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत मूल व बल्लारपूर नगर परिषदेने वैयक्तिक शौचालय

Police action against 52 people sitting in the open on the open | उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५२ जणांवर पोलीस कारवाई

उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५२ जणांवर पोलीस कारवाई

मूल व बल्लारपुरात गूडमार्निंग पथक : मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार
मूल/बल्लारपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत मूल व बल्लारपूर नगर परिषदेने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी विशेष प्रयत्न चालविल्यानंतर मूल शहरात १ हजार ६७५ लाभार्थ्यांना प्रति १५ हजार रुपयाचे अनुदान वितरीत केले. तसेच ६ ठिकाणी वैयक्तिक शौचालयाची दुरुस्ती व एक फिरते शौचालय उभारुन शहर हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प मूलचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व बल्लारपूरचे मुख्याधिकारी विपीन मुदधा यांनी केला. त्या अनुषंगाने गुडमार्निंग पथकाची निर्मिती करून उघड्यावर शौचालय बसणाऱ्या ५२ जणांवर मंगळवारी पोलीस कारवाई करण्यात आली आहे.
पालिकेच्या शौचालय योजनेचा १ हजार २३३ लाभार्थी वापर करताना दिसत आहेत. गेल्या २० वर्षांपासून बंद असलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली असून यात सोमनाथ रोड, चितेगाव रोड, आठवडी बाजार, वरठी बोडी, शिवमाराई, वनविभाग, बसस्थानक या ठिकाणाचा समावेश आहे. माराई मंदिराकडे सार्वजनिक शौचालय नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात सहा सिट असलेले फिरते शौचालय उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे, त्या ठिकाणी उघड्यावर शौचालयाकडे जाणाऱ्याची संख्या अधिक असल्याने रस्त्यारस्त्यावर घाण साचलेली असते. त्यामुळे विविध आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.
आरोग्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यानी रितसर ४५० जणांना नोटीस बजावून उघड्यावर शौचास न बसता सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा तसेच वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अर्ज सादर करण्याबाबत कळविले. १९ डिसेंबरला ‘गुड मार्निंग’ या भरारी पथकाची निर्मिती करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना सकाळी त्या ठिकाणी जावून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५(अ,ब) व ११७ अन्वये सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर बल्लारपुरातही ४६ जणांवर ही कारवाई करण्यात आली.

बल्लारपुरात ४६ जणांवर गुन्हा दाखल
बल्लारपूर : येथील नगरपालिका प्रशासनाने शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले. मात्र काहींनी अद्याप बांधकाम सुरू केले नाही. अनुदानाचा वापर शौचालय बांधकामासाठी न केल्यामुळे येथील राजेंद्र प्रसाद वॉर्डातील तीन, बालाजी वार्ड, पंडिय दिनदयाल वार्ड, मौलाना आझाद वार्ड, महात्मा गांधी वॉर्डातील प्रत्येक दोन, बुद्धनगर, शिवनगर, राणी लक्ष्मी वार्ड व लोकमान्य टिळक वॉर्डातील प्रत्येकी तीन तर संतोषी माता वॉर्डातील सहा व रविंद्र नगर वॉर्डातील १३ असे एकूण ४६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या लाभार्थ्यांनाकडून ‘स्वच्छ शहर, स्वच्छ महाराष्ट्र मिशन’ला गालबोट लावण्याचा प्रकार घडला आहे. बल्लारपूर नगरपरिषद प्रशासनाने गुडमार्निंग पथकाच्या माध्यमातून शहरातील मोकळ्या जागा व बाहेरील भागात गस्त घालण्याची मोहिम सुरू केली. मुख्याधिकारी विपीन मुद्धा, तेजबहादूर थापा यांच्या तपासणीत दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे शहरात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मूल शहर ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार १९ डिसेंबरपासून गुडमार्निंग पथक निर्माण करून कारवाई सुरू आहे. पहिल्या दिवशी सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाचा वावर करावा तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांनी त्वरीत पालिकेत संपर्क करून शौचालय मंजुरीबाबत प्रस्ताव सादर करावा.
- अभय चेपूरवार,
आरोग्य निरीक्षक, न.प. मूल.

Web Title: Police action against 52 people sitting in the open on the open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.