देवाडा-थेरगाव रस्त्याची दुर्दशा

By Admin | Updated: October 9, 2015 01:44 IST2015-10-09T01:44:24+5:302015-10-09T01:44:24+5:30

पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-थेरगाव या मुळ मार्गाची प्रचंड दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

The plight of the Godda-Thergaon road | देवाडा-थेरगाव रस्त्याची दुर्दशा

देवाडा-थेरगाव रस्त्याची दुर्दशा

रस्त्यावर खड्डे : नागरिकांमध्ये प्रचंड संताप
देवाडा खुर्द : पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-थेरगाव या मुळ मार्गाची प्रचंड दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या मार्गावर दररोज कुठे ना कुठे किरकोळ अपघात झाल्याची वार्ता कानी पडते. परंतु, लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सन २०१२ या वर्षी झालेल्या संततधार पावसामुळे थेरगाव रस्त्यावर असलेल्या अंधारी नदीच्या पुलासमोरील संपूर्ण डांबरीकरण उखडले. त्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराला दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कुठलेच पाऊल उचलले नसल्याने या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात पडत असल्याच्या घटना घडत आहेत.
थेरगाव येथे ९० टक्के आदिवासी समाज वास्तव्यास असून पोंभूर्णा येथे तहसील कार्यालय असल्याने त्यांना नेहमीच या रस्त्याने रात्री बेरात्री प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना सुद्धा रस्त्यावरील खड्यांमुळे सायकल चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तर याच गावातील अनेक शाळकरी विद्यार्थी देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात तसेच पोंभूर्णा येथे शिक्षण घेण्यासाठी सायकलने प्रवास करतात. त्यांना सुद्धा या खड्यांमुळे किरकोळ जखमा झाल्याचे बोलल्या जात आहे.
थेरगाव नंतर चिंचाळा हळदी या मार्गावरील संपूर्ण डांबरीकरण उखडले असून त्याठिकाणी संपूर्ण रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने एस.टी. वाहक व खाजगी वाहकांना सुद्धा या मार्गावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा त्रास प्रवाशांना होत असून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. एवढी प्रचंड अवस्था होवून सुद्धा कोणताही अधिकारी व लोकप्रतिनिधीनी या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक पक्षाचे लोकप्रतिनिधी या रस्त्याने मते मागण्यासाठी फिरत होते. तेव्हा त्यांना या रस्त्याचे गांभीर्य दिसले नाही का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या क्षेत्रातून निवडून आलेले आमदार सुधीर मुनगंटीवार जनतेच्या मतांच्या भरवशावर मंत्री झाले असून त्यांनी या रस्त्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून सदर रस्ता तत्काळ दुरूस्त करून परिसरातील नागरिकांना होणारा नेहमीचा त्रास दूर करावा, अशी जनतेची मागणी आहे. याकडे लक्ष द्यावे. (वार्ताहर)

Web Title: The plight of the Godda-Thergaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.