कचरा घोटाळ्यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार
By Admin | Updated: February 25, 2015 01:21 IST2015-02-25T01:21:45+5:302015-02-25T01:21:45+5:30
महानगरपालिकेने घनकचरा संकलनाचे कंत्राट नागपूर येथील सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या कंपनीला दिले आहे. यासाठी मनपाला प्रतिमहिना ५४ लाख रुपये मोजावे लागणार आहे.

कचरा घोटाळ्यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार
चंद्रपूर : महानगरपालिकेने घनकचरा संकलनाचे कंत्राट नागपूर येथील सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या कंपनीला दिले आहे. यासाठी मनपाला प्रतिमहिना ५४ लाख रुपये मोजावे लागणार आहे. सदर कंत्राट देताना सत्ताधाऱ्यांनी नियमाला तिरांजली दिली आहे. सत्ताधारी महानगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करीत असून यासंदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवक प्रविण पडवेकर, नगरसेविका सुनिता लोढिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
घनकचरा जमा करून डम्पींग यार्डवर टाकण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच त्याच कंपनीला २० लाख रुपये प्रति महिन्याचे कंत्राट दिले आहे. सदर कंत्राट रद्द करून सत्ताधाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या हिताचा कोणताही विचार न करताना त्याच कंपनीला दरमहा ५४ लाख रुपयांप्रमाणे कचरा संकलनाचे काम दिले आहे. केवळ एकाच वर्षात २० लाखांवरून ५४ लाख रुपयांचे कंत्राट देण्यामागील उद्देश स्पष्ट झाला नसल्याते ते म्हणाले. विशेष म्हणजे, भाजपाची सत्ता महानगरपालिकेत येताच कचरा उचलण्यासाठी दरमहा ५४ लाख देण्याएवढा कचरा आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे यांना यात लक्ष घालण्याची विनंती करूनही याकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप नागरकर यांनी केला. सर्व पदाधिकाऱ्यांनी संगनमताने कचरा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि लाचलुतपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)