नाट्यकलावंत जगतो आहे उपेक्षेचे जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:29 IST2021-03-23T04:29:36+5:302021-03-23T04:29:36+5:30

पळसगाव (पिपर्डा) :पूर्व विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जाणारी झाडीपट्टी रंगभूमी नाट्यप्रेमीसाठी पर्वणी असते. या रंगभूमीच्या इतिहासात असंख्य कलावंतांनी ...

The playwright lives a life of neglect | नाट्यकलावंत जगतो आहे उपेक्षेचे जीवन

नाट्यकलावंत जगतो आहे उपेक्षेचे जीवन

पळसगाव (पिपर्डा) :पूर्व विदर्भासाठी अभिमानाची बाब मानली जाणारी झाडीपट्टी रंगभूमी नाट्यप्रेमीसाठी पर्वणी असते. या रंगभूमीच्या इतिहासात असंख्य कलावंतांनी आपले आयुष्य वेचले. या कलावंतांनी पूर्वार्धात लोकांचे मनोरंजन केले. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र या रंगभूमीसाठी त्याग करणारा सेवक म्हणून नाते सांगणाऱ्या कलावंतांना सरकार दरबारात उपेक्षितच राहावे लागत आहे.

पिपर्डा या गावाने झाडीपट्टीतील दर्जेदार नाट्यकलावंत, लेखक दिले. अलीकडे दिवंगत झालेले यशवंत पाटील बोरकर यांचे नाव घ्यावे लागेल. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. असाच एक पिपर्डा येथील नाट्यकलावंत दुशासन डोमाजी तागडे. या कलावंताने अनेक उत्सवात होणार्‍या नाटकात भूमिका केल्या. त्यांच्याकडे विलक्षण विनोदबुद्धी आहे, आज मात्र अपघात व अर्धांगवायुमुळे पूर्णतः खचला आहे. त्याने अनेकवेळा शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारले. वारंवार शासकीय कार्यालयात चकरा मारल्यानंतरदेखील त्यांना त्यांच्या हक्काचे मानधन अजून मिळाले नाही. त्यामुळे शासकीय पातळीवर त्यांची अवहेलना सुरू असल्याची भावना वृद्ध कलावंतांनीच व्यक्त केली आहे. कलेच्या प्रतिभेवर समाज जनजागृती, समाज प्रबोधन आणि समाज मनोरंजन करणाऱ्या प्रतिभावान कलावंतांना शासनाकडून पेन्शन स्वरूपात मानधन दिली जाते. कलावंत त्यांच्या उतारवयात स्वाभिमानाने जीवन जगावेत, त्याकरता हे मानधन असते.

कलाक्षेत्रातील वृद्ध कलावंतांना शासनाकडून मदतपर मानधन दिले जाते. मात्र हा कलावंत अजूनही मानधनाच्या प्रतीक्षेतच आहे.

Web Title: The playwright lives a life of neglect