रेल्वे महाव्यवस्थापकांच्या आगमनाने फलाट चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST2021-02-05T07:39:58+5:302021-02-05T07:39:58+5:30
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल मुंबईहून १२ बोगीच्या विशेष रेल्वे गाडीने चमूसह आले होते. ...

रेल्वे महाव्यवस्थापकांच्या आगमनाने फलाट चकाचक
बल्लारपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल मुंबईहून १२ बोगीच्या विशेष रेल्वे गाडीने चमूसह आले होते. रेल्वेच्या आतील समस्या तशाच राहिल्या. मात्र, त्यांच्या आगमनामुळे फलाट क्रमांक एक एकदम चकाचक झाला आहे.
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील क्रमांक एक फलाटाची रंगरंगोटी करण्यात आली. भिंती रंगल्या. वन्यप्राण्यांच्या पुतळ्यांना नवसंजीवनी देण्यात आली. पुलाच्या पायऱ्यांवर नवे चित्र लावण्यात आले. महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची विशेष गाडी फलाट क्रमांक एकवर आल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानक चकाचक पाहून प्रचंड खूश झाले. मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांची मनात धाकधूक होती की, जर ४ आणि ५ फलाटावर गेले, तर काय होणार, परंतु एका तासाच्या वेळेत रेल्वे कार्यालयाच्या भेटीतच महाव्यवस्थापकाचा वेळ निघून गेला. अधिकाऱ्यांनी मोकळा श्वास घेतला. या दिवशी मात्र फ्लॅट क्रमांक एकवर कोणतीही प्रवासी गाडी घेण्यात आली नाही. दोन महिन्यांपासून नागपूर येथून रेल्वेचे सर्व बडे अधिकारी येऊन स्थानकावरील कमीपणा दूर करीत होते. त्यानंतरही फलाट क्रमांक चार व पाच रंगरंगोटीविनाच राहिला. फलाटावर लागलेल्या जुन्या फरशाही नादुरुस्त राहिल्या. अनेक ठिकाणी रेल्वे प्रवाशांना गाडी पकडताना ठेस लागून पळण्याची भीती कायमच आहे. पायऱ्यावरचे जुने चित्र बदलण्यात आले नाही. फलाटावर एक वर्षापासून शेडचे व इतर कामही थंड्याबस्त्यात आहे. काही नळांना तर पाणी येण्याची वाट पाहावी लागते. बल्लारशाह रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वे झोनचे शेवटचे व महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. इथल्या ५ फलाटावरून तामिळनाडू ते दिल्लीकडे जाणारी गाड्यांची वर्दळ असते. या स्थानकावरूनच गाडीचालक, गार्ड, तिकीट निरीक्षकचा स्टाफ बदलतो. डब्यांची देखभाल करण्यात येते, सर्व कोचमध्ये पाणी भरण्यात येते, म्हणूनच दर तीन वर्षांनी मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सरळ बल्लारशाह स्थानकावर येतात. येथूनच त्यांचा रेल्वे स्थानकांना भेटी देण्याचा दौरा सुरू होतो. बल्लारशाह रेल्वे स्थानक इतके महत्त्वाचे असताना, इथल्या रेल्वे प्रवासी संघटनांना चंद्रपूर रेल्वे स्थानकावर महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची भेट घेऊन निवेदन द्यावे लागले व चर्चा करावी लागली, याची खंत डीआरयूसीसीचे सदस्य जयकरणसिंग बजगोती यांनी व्यक्त केली.