जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख वृक्षांचे रोपण
By Admin | Updated: July 7, 2017 01:04 IST2017-07-07T01:04:22+5:302017-07-07T01:04:22+5:30
राज्य शासनाने यावर्षी घेतलेला चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही

जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख वृक्षांचे रोपण
उद्दिष्ट ओलांडणार : महोत्सवाचा आज अखेरचा दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने यावर्षी घेतलेला चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३८ लाख २७ हजार २४४ वृक्षांची लागवड करण्यात आली. शुक्रवार शेवटचा दिवस असून जिल्ह्यातील सर्व यत्रणांनी आपले उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.
१ ते ७ जुलै या काळातील वृक्षलागवडीमध्ये चंद्रपूर जिल्हयाने सुरुवातीपासून आघाडी घेतली असून या उपक्रमाच्या सहाव्या दिवशीच राज्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा आनंद चंद्रपूरकरांनी साजरा केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नागपूर व अमरावती दौऱ्यावर असतानाच त्यांना चार कोटी वृक्षलागवड झाल्याचे कळले. त्यानंतर चंद्रपुरातील सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले असून शुक्रवारी शेवटच्या दिवशी जिल्हयातील सर्व यंत्रणा ४० लाखांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल, असे स्पष्ट केले आहे.
शासनाने महानगरपालिकेला केवळ १५ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र महापौर अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेने ३० हजारांचे स्वत:चे उद्दिष्ट केले होते. आता या उद्दिष्टाला जवळपास दोन हजार वृक्षलागवड कमी असून शुक्रवारपर्यंत हे लक्ष पूर्ण केले जाईल, असे सुतोवाच मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले आहे.
जिल्हयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून आतापर्यंत ११ हजार ६१८ वृक्ष लावले आहे. शुक्रवारपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी सांगितले आहे. वरोरा येथे बुधवारी मोठया प्रमाणात वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत सर्व नगरपरिषदा, ग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था मोठया प्रमाणात योगदान देवून या कार्यक्रमाचा विक्रमी लागवडीने समारोप करतील, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
जि.प. व मनपाचे आकडे
४वनमहोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे यांनी तीन लाख ८० हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले होते. त्यासाठी त्यांनी वृक्षदिंडीचा अभिनव प्रयोग केला होता. ५० गावांमध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेने चार लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याचा विक्रम केला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चार लाख १८ हजार ७३१ वृक्ष लागवड झाली होती. चंद्रपूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ३० हजारांच्या आपल्या उद्दिष्टाच्या जवळपास मजल मारली आहे. आज गुरुवारी तीन हजार ५२ वृक्ष लावण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेने आतापर्यंत २८ हजार १८८ वृक्षलागवड केली आहे.