प्रतिबंधित क्षेत्रात फलक, सीसीटीव्ही कॅमेरे लावा
By Admin | Updated: December 31, 2015 00:47 IST2015-12-31T00:46:17+5:302015-12-31T00:47:31+5:30
प्रतिबंधित क्षेत्र असतानाही सिनाळा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू होतो.

प्रतिबंधित क्षेत्रात फलक, सीसीटीव्ही कॅमेरे लावा
हंसराज अहीर यांचे निर्देश : सिनाळा खाण दुर्घटनास्थळी भेट
चंद्रपूर : प्रतिबंधित क्षेत्र असतानाही सिनाळा कोळसा खाणीतील पाण्यात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. वेकोलि प्रबंधनाच्या अक्षम्य चुकीमुळेच ही दुर्घटना घडली. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रात फलक, सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर दिले.
सिनाळा येथील खाण दुर्घटनास्थळी बुधवारी ना. अहीर यांनी भेट देवून पाहणी केली. भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची दक्षता वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, दुर्गापूरचे सहा.पोलीस निरीक्षक, उपक्षेत्रीय प्रबंधक सिंग, गुप्ता, सरपंच नीता वैद्य, उपसरपंच बंडू रायपूरे, लोकचंद कापगते, पूनम तिवारी, विलास टेंभुर्णे, सुभाष गौरकार, पोलीस पाटील जीवनकला मांडवकर आदी उपस्थित होते.
ऊर्जानगरातील समता नगर येथील बंटी राऊत व अमोल अल्लेवार या दोन युवकांचा बंद स्थितीत असलेल्या सिनाळा खाणीतील पाण्यात बुडून सोमवारी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची दखल घेवून ना. अहीर यांनी घटनास्थळावर जावून वेकोलि अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश केला जातो, ही बाबच गंभीर असून वेकोलि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळेच असे घडत आहे. याची गांभीर्याने दखल घेवून या प्रतिबंधित क्षेत्रात ठिकठिकाणी प्रवेश निषिद असे फलक लावावेत, आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, संपूर्ण क्षेत्राला तारेचे कुंपन करुन या ठिकाणी २४ तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावे, या खाणीतील पाणी जवळच्या तलावात सोडणे शक्य असल्यास तसे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देत भविष्यात असा प्रकार घडल्यास व्यवस्थापनाला दोषी का धरण्यात येवू नये, असेही उपस्थित अधिकाऱ्यांना ना. अहीर यांनी सुनावले. (स्थानिक प्रतिनिधी)