राज्यात दोन वर्षांत प्रगतीच्या दृष्टीने नियोजन

By Admin | Updated: November 2, 2016 00:55 IST2016-11-02T00:55:37+5:302016-11-02T00:55:37+5:30

राज्यात मागील दोन वर्षात प्रगतीच्या दृष्टीने नियोजन झाले.

Planning for progress in two years in the state | राज्यात दोन वर्षांत प्रगतीच्या दृष्टीने नियोजन

राज्यात दोन वर्षांत प्रगतीच्या दृष्टीने नियोजन

सुधीर मुनगंटीवार : सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमित्त संवाद
चंद्रपूर : राज्यात मागील दोन वर्षात प्रगतीच्या दृष्टीने नियोजन झाले. कृषी, पर्यटन, उद्योग, सिंचन या क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्याचा प्रयत्न या काळात जाणीवपूर्वक झाला. त्याचे सकारात्मक परिणाम आता जनतेलाही दिसायला लागले असून राज्य खऱ्या अर्थाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केले.
राज्य सरकारच्या दोन वर्षपूर्तीनिमीत्त आपल्या कामगिरीचा आलेख मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते सर्व नियोजन सरकारने केले आहे. मतदानाच्या रूपाने जनतेने काम करण्याची आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याची संधी दिली. हे लक्षात घेऊनच सर्व क्षेत्रात नियोजनपूर्वक पाऊले उचलली जात आहेत. राज्याचा विकासदर दोन वर्षापूर्वीच्या काळात ५.८ टक्के होता. तो २.२ टक्यांनी वाढवून आता ८ टक्के झाला आहे. ३.३० कोटीचे कर्ज आणि २७ हजार कोटी रूपयांच्या व्याजाचा वारसा घेवून आमच्या सरकारने राज्यात कामाला सुरूवात केली. पेन्शन, मुद्दल या सर्व महत्वाच्या बाबी सांभाळत आणि विकासाचा आर्थिक समतोल साधत राज्य विकासाच्या दिशेने प्रवास करीत आहे.
मागील पाच वर्षात भांडवली खर्च कमी आणि महसुली खर्च अधिक अशी परिस्थिती होती. मागील दोन वर्षात भांडवली खर्च ३५ हजर कोटींवर आणला असून विकासदर वाढवून रोजगारात वाढ केली. दुर्लक्षित असलेल्या कृषी क्षेत्रात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. जलयुक्त शिवार योजनेतून मागील दोन वर्षात ११ हजार ४८६ गावांमध्ये दोन लाख ४१ हजार ९७ कामे झाली. नऊ हजार शेततळी पूर्ण झाली. मागेल त्याला शेततळे हा उपक्रम राबविला. येत्या तीन वर्षात गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा निश्चय आहे.
विदर्भ सिंचन अनुषेशासंदर्भा ना. मुनगंटीवार म्हणाले, अमरावती विभागात दोन वर्षांच्या काळात ३ हजार ६० कोटी रूपयांचा खर्च झाला. काँँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात हा खर्च फक्त एक हजार ७५० कोटींचा होता. २१ हजार ७३५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. अनुशेष भागातील १६ हजार ४७६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले. कृषीक्षेत्रात दुप्पट पैसा खर्च केला. शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात पीक विमा योजनेचा लाभ मिळवून दिला.
शस्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केली. २७ कोटींचा विमा सरकारने भरला. राज्यातील ५१ लाख मोबाईलधारक शेतकऱ्यांना ५८ कोटी एसएमएस पाठविले. आत्महत्याग्रस्त शेतकरी भागात ठोस उपाययोजना केल्या.
शेतकऱ्यांना अर्थिक मदत दिली. मत्स्यव्यवसायात रोजगाराची नवी संधी मिळवून दिली.
राज्यातील अपराधसिद्धी दर पूर्वी नऊ टक्के होता. तो आता ५४ टक्यांवर आणला. यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला. कोणत्याही ठिकाणावरून आॅनलाईन एफआयआर नोंदविण्याची सुविधा निर्माण करून दिली. चंद्रपूरच्या धर्तीवर राज्यात फॉरेन्सिक लॅब उभारण्याचे नियोजन झाले असून कामही सुरू झाले आहे.
पोलीस कल्याणाच्या दृष्टीने सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. गतीमान न्यायासाठी न्यायालयाच्या नव्या ईमारती बांधकामांना मंजुरी दिली. उच्च न्यायालयाचे अभिलेखे डिजिटल करण्यासाठी ३० कोटी रूपये दिले. ऊर्जा क्षेत्रातही मोठी कामगिरी सरकारने केल्याचे सांगून ते म्हणाले, प्रशासकीय कामकाजात अनेक सुधारणा आणि बदल या दोन वर्षात घडवून आणले. त्यामुळे कार्यप्रणाली सुटसुटीत आणि नागरिकांसाठी विनात्रासाची होत आहे.
आदिवासी विकास, शैक्षणिक क्षेत्रातही अनेक नवे निर्णय या दोन वर्षात सरकारने घेतले. आरोग्यच्या दृष्टीने नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण केली. मंजूर वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा वाढविण्यावर आणि योग्य आरोग्य सेवा देण्यावर सरकारचा भर आहे.
वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन या सोबतच ताडोबा अभयारण्य जागतिक दर्जाचे बनविण्याच्या दृष्टीने सरकार कार्यरत आहे. आरोग्य, प्रदूषण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सरकार काम करीत असून अनेक स्तरावर कल्याणकारी योजना राबवित आहे. त्याचा सकारात्मक परिणाम विकासवृद्धीमधून दिसणार आहे, असा दावाही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, सभापती देवराव भोंगळे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Planning for progress in two years in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.