उष्माघातासाठी मनपाचा कृती आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:31 IST2017-02-20T00:31:40+5:302017-02-20T00:31:40+5:30
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारे उष्माघाताचे मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे.

उष्माघातासाठी मनपाचा कृती आराखडा
अंमलबजावणी करणार : मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न
चंद्रपूर : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारे उष्माघाताचे मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे. सर्वाधिक उष्म अशा काही जिल्ह्यांमध्ये असा आराखडा राबविला जाणार असून, त्यात चंद्रपूरचा समावेश आहे. याबाबत, आयुक्त संजय काकडे यांनी कृती आराखडा समितीचा आढावा घेतला.
आढावा बैठकीला उपायुक्त विजय देवळीकर, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. नरेंद्र जनबंधू, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. बिसेन, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्विनी भारत, डॉ. अल्का आकुलवार, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयना उत्तरवार, एमईएमएसचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रशांत घाटे, मनपा प्रभाग अधिकारी सरोदे, जन्म- मृत्यू विभाग प्रमुख ज्योती देशमुख, अतिशकुमार चव्हाण, आर. पी. कळम आदी उपस्थित होते. मनापच्या वतीने गेल्या वर्षी कृती आराखड्यांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात शित वार्ड सुरु करण्यात आला होता. या वार्डात २७ रुग्ण दाखल झाले होते. औषधोपचारानंतर सर्व रुग्ण बरे झाले. एकही मृत्यू झाला नाही. यावर्षीही आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आराखड्यांतर्गत करावयाच्या विविध उपाययोजनांची माहिती डॉ. आंबटकर यांनी पावर पार्इंट प्रेझेंटेशनद्वारे यावेळी दिली. बैठकीत विविध अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारींचा आढावाही घेण्यात आला. आयुक्त काकडे यांनी यावेळी उष्माघात प्रतिबंधाबाबत जनजागृती, बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ, पिण्याच्या पाण्याची जागोजागी उपलब्धता, विविध शासकीय कार्यालयांना त्यांच्या आवारात शेड उभारणी करण्याबाबत निर्देश दिले. चंद्रपूरवासीयांनी मनपाच्या कृती आराखडा अंमलबजावणीत सहकार्य करुन उष्माघातापासून होणाऱ्या दुष्परिणामास स्वत: व इतरांना संरक्षण देण्यासाठी मदत करावे, असे आवाहन महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंत देशमुख, सभापती संतोष लहामगे, एस्तेर शिरवार व आयुक्त, उपायुक्तांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)