स्वच्छता मोहीम
गतिमान करा
मूल : शहरातील प्रत्येक वार्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. शिवाय, गांधी चौक आणि अन्य वॉर्डांतील चौकांतही रस्त्यावर वाहने ठेवण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत.
गडचांदूर-जिवती
मार्गावरील खड्डे बुजवा
कोरपना : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. यावर्षी परिसरात दमदार पाऊस पडला. रस्त्यांची दुरवस्था झाली. त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कचरा टाकणाऱ्यांवर
कारवाईची मागणी
गोंडपिपरी : शहरातील काही प्रभागात रस्त्यावरच कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेने कचराकुंड्यांची संख्या वाढविली. परंतु, नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. त्यामुळे घाण झाली आहे. स्वच्छता मोहिमेला आता अर्थ उरला नाही, असा आरोप सुरू आहे.
आरोग्य केंद्र औषधात
पुरवठा करावा
सिंदेवाही : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य मिळावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यात आले. या केंद्रांतून नागरिकांना शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णांना औषधे मिळत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली.
रोजगार हमीची
कामे वाढवावी
नागभीड : तालुक्यात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र, यावर्षी जॉबकार्ड वाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
तालुक्यात कृषिपंप लावण्याची मागणी
ब्रह्मपुरी : तालुक्यात अनेक शेतकरी भात शेतीसोबतच भाजीपाला पिकेही घेत आहेत. नगदी पिकांंकडे कल वाढू लागला. अनेक शेतकऱ्यांनी जि. प. च्या योजनेतून सिंचन विहिरी खोदल्या. वीज वितरण कंपनीकडून कृषिपंपही घेतले. विहीर खोदून विविध पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, तालुक्यातील विहिरी कोरड्या पडल्या. त्यामुळे भाजीपाल्याची पिके सुकण्याच्या मार्गावर आली आहेत. सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बाबूपेठ परिसरात स्वच्छता कर्मचारी पाठवावे
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील विविध वॉर्डांत घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वार्डांतील नाल्यांचा उपसा होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढून आजार होऊ शकतात. मनपाचे स्वच्छता कर्मचारी या परिसरातील प्रमुख वार्डांत दररोज येतात. मात्र, आडवळणाच्या प्रभागात जात नाही. त्यामुळे स्वच्छतेची कामे रखडली, असा आरोप नागरिक करीत आहेत.
मोकाट जनावरांचा
बंदोबस्त करावा
नागभीड : शहरातील डुकरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगर परिषदेने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी नगरपरिषदेकडे केली आहे.