मिरची पूड डोळ्यात टाकून लुटणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 00:56 IST2016-02-04T00:56:26+5:302016-02-04T00:56:26+5:30
रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेची बॅग लंपास करणाऱ्या टोळीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या....

मिरची पूड डोळ्यात टाकून लुटणारी टोळी जेरबंद
सहा जणांना अटक : ८ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेची बॅग लंपास करणाऱ्या टोळीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या टोळीत सहाजणांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
फईम अबरार शेख (२४), शाहरूख अली अहमद अली (१८), शेख अजहर शेख मेहराज (२४), मेहबूब आलाम आकत खान (२२), सद्दाम हुसेन अफसर हुसेन व फरहान शेख शब्बीर शेख अशी आरोपींची नावे असून हे सर्वजण चंद्रपूर शहरातील रहिवासी आहेत. २५ जानेवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गावर ही लुटमारीची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
परंतु शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने हे आव्हान स्विकारून आरोपींना जेरबंद केले. विशेष म्हणजे ७ सप्टेंबर २०१५ रोजी स्थानिक श्री टॉकीज परिसरात शब्बीर लक्कडशाह व मुर्तुजा लक्कडशाह या व्यापाऱ्यांजवळी पाच लाख रुपये भरून असलेली बॅगही या टोळीतील आरोपींनीच लंपास केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. (पान ४ वर)
लाईफ स्टाईल बदलल्याने उघडले रहस्य
लुटमारप्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयितांची माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते चंद्रपुरात सापडले नाहीत. त्यांच्या शोधासाठी नागपूर, हैदराबाद, राजुरा येथे पथक पाठविण्यात आले. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात आले. सोबतच ११७ दुचाकी वाहनांची चौकशी केली. खबऱ्यांना पाळत ठेवण्याच्या सुचना पोलिसांनी केल्या होत्या. यादरम्यान, एका गरीब युवकाजवळ महागडी पल्सर दुचाकी असल्याचे व त्याची लाईफ स्टाईल अचानक बदलल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. याच आधारावर चौकशी करीत सदर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर मुख्य आरोपी फईम शेख हा २५ जानेवारीच्या लुटमारीतील सर्व मुद्देमाल घेऊन पळून गेला, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी फईमला नागपुरातील एका हॉटेलमध्ये अटक केली तर अन्य एका आरोपीला चंद्रपुरातून अटक करण्यात आली.
पोलीस चमूला १० हजारांचे बक्षीस
या प्रकरणाचा तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलिसांच्या चमूला १० हजारांचे बक्षिस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी जाहीर केले. हे प्रकरण तडीस नेण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल ताजने, सहाय्यल पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, उपनिरीक्षक विवेक देशमुख, मेश्राम, सहाय्यक फौजदार शेख रहुफ, सुरेश केमेकर, अफसर खान, किशोर तुमराम, बळवंत शर्मा, प्रकाश बल्की, पाल, चौधरी, चालेकर, वाघमारे, दादुरवाडे, आतकुलवार, वैरागडे, चिकाटे, गिरडकर, शिंदे, बांबोळे यांनी परिश्रम घेतले.