सिंदेवाही : राज्यातील व्यवसाय व शिक्षण- प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. मात्र, यावर्षी प्रथमच ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील आयटीआय तसेच इतर ठिकाणीही संगणक कक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना ४० ते ५० कि.मी. प्रवास करून परीक्षा द्यावी लागत आहे. त्यामुळे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रथम संगकणप्रणाली विकसित करून नंतरच ऑनलाइन परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे.
कोरोना संकटामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बंद होत्या. दरम्यान, आता राज्यातील आयटीआय २०२१ ची वार्षिक परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्याचा सराव नाही. त्यातच ४० ते ५० कि.मी. पायपीट करून केंद्रावर जावे लागत आहे. त्यामुळे यावेळी नापास होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. कॉम्प्युटर बेस टेस्ट (सी.बी.टी.) प्रशिक्षणाकरिता संगणकाची आवश्यकता असते. शहरातील आयटीआयमध्येही सुविधा आहे. मात्र, तालुकास्तरावरील आयटीआयमध्ये ही सुविधा आजही उपलब्ध नाही. मात्र, सराव नसताना विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागत आहे.
सिंदेवाही तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागभीड येथे जावे लागत आहे. यामध्ये ४० कि.मी.चे अंतर असून, नागभीड येथील संस्था गावाच्या बाहेर आहे. त्यामुळे जाण्या-येण्याचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.