पोंभुर्णा येथील पाईप लाईन लिकेज
By Admin | Updated: May 21, 2015 01:22 IST2015-05-21T01:22:52+5:302015-05-21T01:22:52+5:30
तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा वस्तीमध्ये घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो.

पोंभुर्णा येथील पाईप लाईन लिकेज
पोंभुर्णा: तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पोंभुर्णा वस्तीमध्ये घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. सदर पाईप लाईन अनेक ठिकाणी लिकेज झाली आहे. त्यातून निघणारे पाणी शेतशिवारात साचल्याने त्याठिकाणी पाण्याचा पूर आलेला आहे. तर गावामध्ये मात्र पाणी टंचाई असल्याने रामनगर येथील महिला व्हॉल्व्हमधून येणाऱ्या गळतीच्या पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. याकडे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
पोंभुर्णा येथे घाटकूळ येथील अंधारी नदीच्या पात्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो. सदर कंत्राट सावली तालुक्यातील साखरी येथील गड्डमवार या कंत्राटदाराकडे असून ते याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असतात. याठिकाणी पाईप लाईन लिकेज होणे ही नित्याचीच बाब आहे. यावर मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचेसुद्धा अंकुश नसल्याने कंत्राटदाराचे मात्र फावत आहे. गावातील ग्रामस्थांना मात्र पाणी टंचाई समस्येचा सामना करावा लागत आहे. सदर पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन वेळवा रोडला लागून असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने त्या ठिकाणच्या शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याच ठिकाणी गावातील गुरे-ढोरे बसतात. त्यामुळे नागरिकांना मिळणारे पिण्याचे पाणी दूषित होत असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)