वढा यात्रेनिमित्त भाविकांची होणार गर्दी
By Admin | Updated: November 6, 2014 01:12 IST2014-11-06T01:12:09+5:302014-11-06T01:12:09+5:30
येथून जवळच असलेल्या वढा-जुगाद येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त यात्रा भरणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली आहे.

वढा यात्रेनिमित्त भाविकांची होणार गर्दी
घुग्घुस : येथून जवळच असलेल्या वढा-जुगाद येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त यात्रा भरणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.
पैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनीवर प्राचिन विठ्ठल रुक्मिनीचे मंदीर आहे. वढा व जुगाद येथील प्राचिन शिवमंदिर धार्मिक विविधतेने परिचित आहे. कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी या पंचक्रोशीतीलच नव्हे तर, विदर्भातून हजारो भाविक येथे स्नान करण्याकरिता येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेवून चंद्रपूर एसटी महामंडळाकडून यात्रेकरिता विशेष बसेस व्यवस्था करण्यात आली आहे.
पूर्वीपासून या संगमावर कार्तिक पोर्णिमेनिमित्त यात्रा भरते. नदी काठावर पायऱ्या आहेत. त्याठिकाणी अनेक देवदेवतांचे मंदिर आहेत. यात कार्तिकेयची मूर्ती सुद्धा होती. मात्र त्या मूर्तीला शेंदूर लावल्याने मूर्तीचे मुळ स्वरूप बदलले. शेंदूर काढून त्याची पाहणी केली असता ती मूर्ती शिवपूत्र कार्तिकेय असल्याचे उघड झाले. याच काठावर पंढरपूर पायदळवारी करणाऱ्या एका महिलेने विठ्ठल रुक्मिनीची मूर्ती आणली आणि त्या काळात मंदिर बांधून त्या मूर्तीची स्थापना केली. येथील जिर्ण मंदिराचे पूर्ननिर्माण करण्यात आले आहे. जुगाद येथे हेमाडपंती शिवालय आहे. या मंदिराचे दहा वर्षापासून जिरर्णोदाराचे काम सुरु आहे. दरवर्षी दोन्ही मंदिारात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. (वार्ताहर)