रुग्णांचा अजूनही बैलबंडीने प्रवास
By Admin | Updated: December 4, 2014 23:06 IST2014-12-04T23:06:01+5:302014-12-04T23:06:01+5:30
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचा दिंडोरा राज्य शासनाकडून पिटविला जातो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक आरोग्य सेवेपासून कोसोदूर आहेत.

रुग्णांचा अजूनही बैलबंडीने प्रवास
शोकांतिका : ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे धिंडवडे
प्रविण खिरटकर - वरोरा
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचा दिंडोरा राज्य शासनाकडून पिटविला जातो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिक आरोग्य सेवेपासून कोसोदूर आहेत. गंभीर बाब अशी की शहरी भागात धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा स्पर्श अद्यापही ग्रामीण भागातील काही गावांना झाला नाही. अतिशय गंभीर अवस्थेत रुग्णांना रुग्णालयात दाखल करावयाचे असल्यास बैलबंडीने आणावे लागत आहे.
वरोरा तालुक्यात माढेळी, नागरी, कोसरसार, सावरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वरोरा शहरात उपजिल्हा रुग्णालय आहे. त्यामुळे वरोरा तालुक्यात जवळपास सहा शासकीय रुग्णवाहिका आहे. यासोबतच अनेक खासगी रुग्णवाहिका आहे. १०८ क्रमांकावर कॉल करा रुग्णवाहिका उपलब्ध असल्याच्या मोठमोठ्या जाहिराती आजही सुरु आहेत. परंतु ही जाहिरात ग्रामीण भागात पोहचविण्याचे सौजन्य आरोग्य विभागाने दाखविले नसल्याने ग्रामीण भागातील जनता याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. वरोरा तालुक्यातील खैरगाव येथील नामदेव वरारे या व्यक्तीस ताप आला. गावात शासकीय व खासगी रुग्णसेवेची वाणवा असल्याने त्वरित उपचार मिळाले पाहिजे म्हणून त्यांच्या कुटुंबियानी बैलबंडी जुंपली. बैलबंडीत गादी टाकून थेट वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय गाठून प्रकृती दाखविली. ताप अधिक असल्याने नामदेवला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारार्थ दाखल करुन घेतले. वरोरा ते खैरगाव अंतर नऊ किलोमीटरचे आहे. या नऊ किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका गेली असती.
एखादे खासगी वाहनही किरायाने घेऊन रुग्णालय गाठता आले असते. परंतु ग्रामीण भागात सोयाबीन व कापसाला दर नाही. त्यामुळे आर्थिक चणचण असल्याने रुग्णांनाही बैलबंडीतून प्रवास करीत रुग्णालय गाठावे लागत आहे. यासोबतच रुग्णवाहिका मिळण्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे झाले आहे.