आज स्पष्ट होणार रिंगणातील चित्र
By Admin | Updated: September 30, 2014 23:34 IST2014-09-30T23:34:08+5:302014-09-30T23:34:08+5:30
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे.

आज स्पष्ट होणार रिंगणातील चित्र
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे.
सहाही विधानसभा मिळून १५३ उमेदवार रिंगणात आहेत. यात, राजुरा मतदारसंघात १९, चंद्रपुरात २१, बल्लारपुरात १८, ब्रह्मपुरीत २१, चिमूरमध्ये ४२ तर वरोरामध्ये ३२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार चिमूर मतदार संघात असून त्या पाठोपाठ वरोराचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, या दोन्ही मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांनी कायम ठेवलेले अर्ज या पक्षाच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. हे ओळखून नामांकन परत घेण्यासाठी संबंधितांवर पक्षनेत्यांकडून भर दिला जात असल्याची माहिती आहे.
वरोरा मतदार संघात भाजपामध्ये असलेला तिढा अद्यापही सुटलेला नाही. येथे भाजपाकडून सात जणांचे नामांकन आहेत. भाजपाने संजय देवतळे यांना तिकीट दिल्यापासून उसळलेला क्षोभ अद्यापही शमलेला नाही. यामुळेच अखेरपर्यंत कुणीही नामांकन परत घेतले नसल्याची चर्चा आहे. तर, चिमूरमध्येही भाजपाकडून पाच जणांचे नामांकन आहेत. बंटी भांगडिया यांना भाजपाने तिकीट दिल्याने पक्षातील चार जणांनी आपले नामांकन रिंगणात ठेवले आहेत. या दोन्ही ठिकाणी सर्वांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात किती यश आले हे बुधवारी दुपारी ३ वाजतानंतर दिसणार आहे.
या वेळच्या निवडणुकीत अपक्षांची डोकेदुखी सर्वच ठिकाणी वाढणार असे दिसत आहेत. या सोबतच अन्य पक्षांपेक्षा भाजपामध्ये दोन मतदार संघात बंडखोरांकडून डोके वर काढले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतसे मतदार संघातील राजकीय वातावरण तापत आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांच्या जाहीर सभांनाही मतदारसंघांमध्ये सुरूवात झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)