पेट्रोल पंपलगत आग; मोठा अनर्थ टळला
By Admin | Updated: March 24, 2015 00:36 IST2015-03-24T00:36:06+5:302015-03-24T00:36:06+5:30
स्थानिक शांतीवन ले-आऊट मधील वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

पेट्रोल पंपलगत आग; मोठा अनर्थ टळला
वरोरा : स्थानिक शांतीवन ले-आऊट मधील वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील हा भाग पेट्रोल पंपला लागून आहे. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
स्थानिक शांतीवन ले-आऊटच्या पुढील भागात रिलायन्स पेट्रोल पंप आहे. ले-आऊटच्या बाजूने उड्डाणपूल असून नागरिकांची सतत वर्दळ असते. याच ठिकाणी मोकळी जागा असून बाभुळ आणि इतर झाडांची वाढ झाल्यामुळे काही जण धुम्रपान करतानाही येथे दिसतात. सोमवारी दुपारी ४ वाजता कुणीतरी जळती सिगारेट झाडात फेकल्याने वाळलेल्या पालापाचोळ्याने अचानक पेट घेतला आणि क्षणातच आग पसरली. ही आग पेट्रोलपंपापासून अवघ्या तीन मीटर अंतरावर असताना काही नागरिकांना धूर दिसला आणि लगेच नगर परिषदेच्या अग्निशामन दलाला दूरध्वनीवरुन पाचारण करण्यात आले. काही वेळातच पालिकेचे अग्निनशमन दल पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळावर नागरिकांची मोठी गर्दी जमली. विशेष म्हणजे पेट्रोल पंपाच्या पेट्रोल साठवणुकीच्या टाक्या अगदी लागून असल्याने अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्परतेने आग विझवण्यात मग्न होते. यात संतोष पातालबंसी, रवी बरसे, उमेश ब्राम्हणे, मधू खिरटकर आणि संभा मेश्राम आदी कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)