पार्श्वभागात पेट्रोल टाकून मारहाण
By Admin | Updated: April 20, 2016 01:27 IST2016-04-20T01:27:17+5:302016-04-20T01:27:17+5:30
एका अल्पवयीन मुलाला दारूच्या प्रकरणात अटक केल्यानंतर शेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकून त्याला बेदम मारहाण केली,

पार्श्वभागात पेट्रोल टाकून मारहाण
पोलीस अधिकाऱ्याचे कृत्य: पिडीताच्या पित्याने केला आरोप
वरोरा: एका अल्पवयीन मुलाला दारूच्या प्रकरणात अटक केल्यानंतर शेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकून त्याला बेदम मारहाण केली, असा खळबळजनक आरोप पिडीत मुलाच्या पित्याने केला आहे.
पिडीत मुलगा शेगाव येथे मामाकडे येथे पाहुणा म्हणून आला होता. पोलिसांच्या मारहाणीनंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्याच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पिडीत मुलाच्या वडिलाने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली केली आहे. भद्रावती येथील रहिवासी केशव टापरे यांचा १७ वर्षीय मुलगा योगेश नवघरे शेगाव येथे आपल्या मामाकडे गेला होता. केशव टापरे यांच्या मुलाला त्यांचे नातेवाईक विश्वास टापरे यांनी त्यांच्या दुकानातील नोकर महात्मा निमजे यास बोलाविण्यास पाठविले. त्याचवेळी शेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी महात्मा निमजे याच्या घरी अवैध दारूबाबत चौकशी करीत होते.
दरम्यान केशव टापरे यांचा मुलगा तेथे पोहचला. तोदेखील दारूच्या व्यवसायात सहभागी असल्याचा आरोप करून म्हणून त्यालाही पोलीस ठाण्यात नेले व अवैध दारू प्रकणी अटक केली. मी या धंद्यात नाही.महात्मा निमजे यांना बोलविण्यासाठी आलो होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी मुलाचे काहीही न ऐकता त्याला अटक केल्याचा आरोप केशव टापरे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)
घटनेच्या दिवशी सकाळी सात वाजता टापरे यांच्या दुकानाच्या बाजुला तीन लाख ४९६ रुपयांची दारू पकडली असता त्या ठिकाणी सदर मुलगा हजर होता. टापरे यांच्या दुकानात काम करीत होता. तो दारु पुरवठा करीत होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल सुधारगृहात पाठविले.
त्याला कोणत्याही प्रकारची मारझोड व पेट्रोल टाकण्याचा प्रकार झाला नाही.
- प्रवीण डांगे, ठाणेदार शेगाव पोलीस स्टेशन