११ नगरसेवकांविरुध्दची याचिका फेटाळली

By Admin | Updated: August 6, 2015 02:02 IST2015-08-06T02:02:21+5:302015-08-06T02:02:21+5:30

स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामू तिवारी यांच्यासह ११ नगरसेवकांविरुध्द अपात्रतेची कारवाई ...

A petition against 11 corporators rejected | ११ नगरसेवकांविरुध्दची याचिका फेटाळली

११ नगरसेवकांविरुध्दची याचिका फेटाळली

महापौरांवरील संकटही टळले : तिवारी, लहामगेसह ११ नगरसेवकांना दिलासा
चंद्रपूर : स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामू तिवारी यांच्यासह ११ नगरसेवकांविरुध्द अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची याचिका आयुक्त अनुपकुमार यांनी फेटाळली. ही याचिका नगरसेवक प्रशांत दानव आणि नगरसेविका सुनिता लोढिया यांनी दाखल केली होती. विशेष म्हणजे, या ११ नगरसेवकांमध्ये महापौर राखी कंचर्लावार यांचेसुध्दा नाव होते. मात्र आयुक्तांच्या निर्णयामुळे महापौर राखी कंचर्लावार यांच्या सदस्यत्वावर घोंगावणारे संकटही टळले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी स्वतंत्रपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीचे गटनेता म्हणून संतोष लहामगे यांची निवड करण्यात आली होती. मात्र मागील महापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी महापौर पदासाठी काँग्रेसचा उमेदवार उभा केला होता. लोकशाही आघाडीमध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांसाठी एक व्हीप जारी करून स्वतंत्रपणे उभ्या असलेल्या काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीतील काँग्रेस नगरसेवकांनी या सूचनाचे पालन केले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून महापौर पदासाठी उभ्या असलेल्या सुनिता लोढिया व प्रशांत दानव यांनी याविरोधात विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करीत माजी सभापती रामू तिवारी, सभापती संतोष लहामगे, राजेश अड्डूर, सुभेदिया कश्यप, मेहर सिडाम, राखी कंचर्लावार, करीमुद्दीन काजी, संगिता अमृतकर, एकता गुरले, अनिल रामटेके आणि दुर्गेश कोडाम यांचे महापालिकेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना आयुक्त अनुप कुमार यांनी दोन्ही याचिका फेटाळल्या. या सुनावणीदरम्यान त्यांनी सांगितले की नियमानुसार आघाडी स्थापन केल्यानंतर मूळ राजकीय पार्टी आघाडीमधील सदस्यांमधून आपला नेता निवडू शकत नाही. शिवाय मूळ राजकीय पक्षाने जारी केलेल्या व्हीपचे उल्लंघनही त्या सदस्यांची योग्यता प्रभावित करीत नाही.
याबाबत मनपाचे माजी सभापती रामू तिवारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा सत्याचा विजय असल्याचे म्हटले. विकासात बाधा बनण्यापेक्षा शहराच्या विकासात सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. यासंदर्भात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: A petition against 11 corporators rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.