कापणीपूर्व धानपिकांवर किडीचा प्रादुर्भाव
By Admin | Updated: October 18, 2015 01:15 IST2015-10-18T01:15:40+5:302015-10-18T01:15:40+5:30
अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.

कापणीपूर्व धानपिकांवर किडीचा प्रादुर्भाव
चिरोली : अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.
सभोवताल जंगले, तलाव, टेकड्या, नदी या नैसर्गिक घटकांनी व्यापलेल्या परिसरात मुख्य पीक हे धानाचे घेतले जाते. शेतीच्या मशागतीपासून शेतकरी वर्ग बी-बियाणे, रासायनिक खते, निंदण व फवारण्यावर लाखो रुपयांचा खर्च करुन उत्पादन घेतात. त्यामुळे कौटुंबिक देवाण-घेवाण करुन उदरनिर्वाह करणारे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशातच यावर्षीच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प व सिंचनाच्या सोई अपुऱ्या असल्याने धानपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या परीने मोटरपंप व इंजिनद्वारे मिळेल त्या मार्गाने आवश्यक पुरवठा करण्याचा प्रयत्न चालवला असताना मानमोडी, बुरशीसारख्या रोगांना प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.
अशा परिस्थितीत शासनाने पिकांच्या संवर्धनासाठी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)