अनुज्ञेय खर्चमर्यादा ठरतेयं मारक
By Admin | Updated: December 18, 2014 00:49 IST2014-12-18T00:49:24+5:302014-12-18T00:49:24+5:30
शासनाच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या परिरक्षण व दुरुस्तीच्या मापदंडानुसार मागील तीन वर्षातील सरासरी सिंचनावरुन व मागील ...

अनुज्ञेय खर्चमर्यादा ठरतेयं मारक
चंद्रपूर : शासनाच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या परिरक्षण व दुरुस्तीच्या मापदंडानुसार मागील तीन वर्षातील सरासरी सिंचनावरुन व मागील तीन वर्षातील पाणीपट्टीच्या सरासरी वसुलीवरुन अनुज्ञेय खर्च काढला जातो व दोन पैकी जी कमीतकमी रक्कम आहे, तीच रक्कम अनुज्ञेय खर्च म्हणून घेण्यात येतो. मात्र, ही खर्च मर्यादा मारक ठरत असल्याने पाणी वाटपात अडचणी येत आहेत. त्यामुळे परिरक्षण व दुरुस्तीच्या मापदंडात सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने पाणीपट्टीचे दर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ५० टक्के सवलतीमुळे निम्मे आहेत. तसेच मामा तलावाखालील क्षेत्र निस्तार हक्काचे असल्याने त्यावर आकारणी होत नाही. खरीप हंगामातील सर्व क्षेत्र करारनामा क्षेत्र असल्याने त्यावरील पाणीपट्टीचे दरही निम्मे आहेत.
या सर्व कारणांमुळे सिंचन प्रकल्पावरील पाणीपट्टी वसुली निम्म्यानेच होत असते. त्यामुळे सरासरी पाणीपट्टी वसुलीच्या प्रमाणात अनुज्ञेय खर्चाची मर्यादा चंद्रपूर जिल्ह्यासाठी अन्यायकारक ठरत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे परिरक्षण व दुरुस्तीसाठी किमान १२०० रुपये प्रति हेक्टर मापदंड होणे आवश्यक आहे. याची शासनाने दखल घ्यावी. (स्थानिक प्रतिनिधी)