बामणीच्या तलावात राहणार बारमाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:00 IST2018-01-14T23:59:37+5:302018-01-15T00:00:19+5:30

बल्लारपूरला लागून असलेल्या बामणी (दुधोली) येथील तलावात आता बारमाही पाणी भरून राहणार आहे.

Perennial water will remain in the basin lake | बामणीच्या तलावात राहणार बारमाही पाणी

बामणीच्या तलावात राहणार बारमाही पाणी

ठळक मुद्देकाम तीव्र गतीने सुरू : बल्लारपूर वेकोलिकडून पाणी पुरवठा

वसंत खेडेकर।
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : बल्लारपूरला लागून असलेल्या बामणी (दुधोली) येथील तलावात आता बारमाही पाणी भरून राहणार आहे. बल्लारपूर वेकोलिने तशी उपाययोजना केली असून पाणी पुरवठ्याकरिता पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
बल्लारपूर येथे भूमीगत कोळसा खाण आहे. खाणीत झºयातून झिरपणारे पाणी पंपाद्वारे बाहेर फेकल्या जाते. मात्र ते पाणी वाया जात आहे. वाया जाणारे हे पाणी बामणीकडे वळवून तलावात ते साठवणे सुरू केल्यास हिवाळा व उन्हाळ्यात कोरडे पडत असलेले हे मोठे तलाव पाण्याने बाराही महिने भरून राहील. त्याचा फायदा जनावरे, शेतीला होईल तसेच गावातील हातपंप आणि विहिरींची पाण्याची पातळी उन्हाळ्यातही कायम राहील. पेयजलाचे संकट गावात उद्भवणार नाही, अशी कल्पना व उपाय सरपंच सुभाष ताजणे यांच्या मनात आले.
वेकोलिने याकरिता पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी वेकोलिकडे केली. वेकोलिनेही ही मागणी मान्य केली. इतकेच नव्हे तर कोळसा खाण ते बामणी तलावापर्यंत पाणी पुरवठ्याकरिता पाईप लाईन टाकण्याची जबाबदारीही वेकोलि व्यवस्थापनाने स्वत:कडे घेतली. बल्लारपूर कॉलरी ते बामणीतील तलाव यात सुमारे दोन हजार मीटर अंतर आहे. एवढ्या मोठ्या अंतरात पाईप लाईन टाकली जात आहे. यावर प्राथमिक स्वरूपात ३२ लाख रुपये खर्च येणार आहे.
पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून ते एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होवून त्यानंतर हा तलाव पाण्याने लबालब भरून राहणार आहे. वेकोलि हे काम जनहितार्थ असलेल्या कॅपीटल निधीतून करीत आहे. हा तलाव बाराही महिने पाण्याने भरून राहावा याकरिता वेकोलिने पुढाकार घेतला आहे. बल्लारपूर सब एरिया मॅनेजर जितेंद्र तिवारी, ज्येष्ठ अभियंता नरेंद्र उके, कार्यालय अधीक्षक पी.एस. पोटे हे पाणी लवकरात लवकर तलावात पोहचवावे, या कामी लागले आहेत.
पावसातील पाण्याचा तलावात येणारा लोट ज्या मार्गाने येई, त्यातील बरेचसे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे हे तलाव पावसात तुडूंब भरत नाही. हिवाळ्यातच हा तलाव कोरडा पडतो. त्यावरुन उन्हाळ्यात या तलावाची काय स्थिती असणार, याची कल्पना येते.
शनिवारला बामणीचे सरपंच सुभाष ताजने, उपसरपंच जमीन शेख, सदस्य श्रीहरी अंचुर, जि. प. सदस्य अ‍ॅड. हरिष गेडाम, संजय दरवडे यांनी वेकोलित जाऊन अधिकाºयांची भेट घेतली व सुरू असलेल्या कामाबाबत चर्चा केली.
खोलीकरण आवश्यक
बामणीतील हा जुना मामा तलाव १४ एकरात आहे व हे बल्लारपूर कोठारी मार्गावर गावात आणि रस्त्यालगत आहे. हे तलाव आधी बरेच खोल होते. माती उपसा न झाल्याने ते बरेचसे उथळ झाले आहे. त्यामुळे या तलावाचे खोलीकरण करणे आवश्यक झाले आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.

बामणी तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तशी मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून जेवढे खोलीकरण करता येईल, तेवढे केले जाईल.
- सुभाष ताजने
सरपंच, बामणी.

Web Title: Perennial water will remain in the basin lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.