वाढीव कराने जनतेचा खिसा हलका
By Admin | Updated: January 3, 2016 01:25 IST2016-01-03T01:25:37+5:302016-01-03T01:25:37+5:30
शहरातील मालमत्तेचे फेरमूल्यांकन झाले. करात भरमसाठ वाढ होणार असल्याची ओरड जनतेतून होऊ लागली

वाढीव कराने जनतेचा खिसा हलका
नागरिकात संताप : फेरमूल्यांकनानंतर मूल नगरपालिकेचा निर्णय
चंद्रपूर : शहरातील मालमत्तेचे फेरमूल्यांकन झाले. करात भरमसाठ वाढ होणार असल्याची ओरड जनतेतून होऊ लागली. सत्ताधाऱ्यांनी फेरमूल्यांकन रद्द करून जुन्या करावर २० टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र, आता फेरमूल्यांकनावर मागविलेल्या आक्षेपांवरील सुनावणीनंतर करआकारणी करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या नगररचनाकार विभागाने घेतला. त्यामुळे मूलवासीयांना भरमसाठ मालमत्ताकर भरावा लागणार असल्याने त्यांचा खिसा हलका होणार आहे.
नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेचे मूल्यांकन करण्याचे शासनाने निर्देश दिले होते. त्यानुसार मूल नगरपालिकेने १९९२ नंतर प्रथमच फेरमूल्यांकन करीत चार वर्षांसाठी नवीन कर आकारण्याचे ठरविले. त्यानुसार सभेत ठराव पारित करण्यात आला. शहरात ६ हजार ८२४ मालमत्ताधारक फेरमूल्यांकन नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले.
मालमत्ताकरात भरमसाठ वाढ होण्याचे भाकीत वर्तवित मूलवासीयांनी फेरमूल्यांकनावर आक्षेप नोंदविला. राजकीय पुढाऱ्यांसोबतच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही जनतेच्या सुरात सूर मिसळविला. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने फेरमूल्यांकनावर जनतेकडून आक्षेप मागविले. या आक्षेपावरील सुनावणीसाठी नागरिकांनी पालिकेत मोठी गर्दी केली होती. मात्र, जनतेचे समाधान झाले नाही.
त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी फेरमूल्यांकन रद्द करून जुन्या करावर २० टक्के वाढीव कर लावण्याचा निर्णय सभेत घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सभेत मंजूर ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची होती. मात्र, अजूनपर्यंत ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला नाही. त्यामुळे आता मूलवासीयांना फेरमूल्यांकनानुसार मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)