लोकांचा घामाचा पैसा तस्करांच्या घशात
By Admin | Updated: January 5, 2017 00:55 IST2017-01-05T00:55:28+5:302017-01-05T00:55:28+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना जिल्ह्यातील बऱ्याच गावात दारू तस्कराकडून दारूचा महापूर वाहत आहे.

लोकांचा घामाचा पैसा तस्करांच्या घशात
तेलंगणातील दारू : राजुरा-बल्लारपूर शहरात महापूर
राजुरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना जिल्ह्यातील बऱ्याच गावात दारू तस्कराकडून दारूचा महापूर वाहत आहे. मागेल त्याला दारू असा प्रकार सध्या सर्वत्र दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवणारे राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाच्या निष्क्रीयतेमुळे तेलंगणा, मध्यप्रदेश, दमण, महाराष्ट्र राज्यातील परवानाधारकाकडून तस्कराच्या माध्यमातून दारूचा पुरवठा करून बिनधास्त विक्री सुरू आहे. विविध राज्याचे लेबल असलेल्या बॉटलमधली दारू असली की नकली याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस विभागाचे खुफीया, डि.बी. स्काट, पोलीस पाटील, पोलीस मित्र व खबरे यांच्या अनभिज्ञताबाबत जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
शासनाकडून दारूबंदीचा निर्णय घेताना आम जनतेच्या हिताचा विचार करण्यात आला होता. दारूमुळे बरेच कुटूंब उद्ध्वस्त झाले. घरातील वादात वाढ झाली. अशांततेच सर्वत्र वातावरण पसरले होते. त्यामुळे आम जनता व महिलांनी संघटित होवून शासनास दारूबंदी करण्यास भाग पाडले. शासनाचा निर्णय सार्थक ठरेल, असा विश्वास महिलांमध्ये निर्माण झाला होता. परंतु पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे विश्वासघात झाल्याचे सर्वत्र म्हटले जात आहे.
सध्या जिल्ह्यातील बऱ्याच गावात खुलेआम दारू विक्री सुरू आहे. राजुरा व बल्लारपूर शहरात तेलंगणा, मध्यप्रदेश, दमण व महाराष्ट्र राज्यातील दारूचा महापूर वाहत आहे. तस्करांना पोलिसांची भीती नाही, पोेलिसांची वचक फोल ठरली आहे. राजुरा व बल्लारपूर शहरात राज्यमार्ग व रेल्वेमार्गाने दारूची तस्करी सुरू आहे. त्यावर आळा घालणारे दुर्लक्ष करीत असल्यामुळे पुरवठा व विक्री सर्रास सुरू आहे.
राजुरा व बल्लारपूर येथील ठोक व्यवसाय करणाऱ्यांनी मजुरी किंवा कमीशनवर युवकांना लावून जोमात विक्री करीत आहे. हा लपाछुपीचा विक्री धंदा पोलिसांच्या नजरेत का येत नाही, याबाबत आम जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहे. ठोक विक्रेत्याकडून बॉटल घेवून अल्पशा लागवडीत मोठी नगदी कमाई होत असल्यामुळे या धंद्यात बऱ्याच युवकांनी भाग घेणे सुरू केले आहे. शहरातील धंदा पाहून बऱ्याच खेड्यातसुद्धा हाधंदा सुरू झाला आहे. जे वातावरण दारूबंदीपूर्वी होते तेच वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. शहरातील आड मार्गावर, सार्वजनिक मुत्रीघर, खेड्यातील रस्त्यावर, पडक्या घरात दारूच्या रिकाम्या बॉटल पडलेल्या दिसतात. फरक एवढाच पडला की अगोदर ४० रुपयात मिळणारी देशी दारूची बॉटल आता १५० रुपयात खरेदी करावी लागत आहे. मद्यपी लोकांना दारू पिणे आवश्यक असून त्यांना तिप्पट दराने रक्कम देवून आपली गरज पूर्ण करावी लागत आहे. दारूबंदीनंतरचा दारू तस्कराचा व्यवसाय बऱ्याच लोकांना लाभदायक ठरत आहे. बल्लारपूर शहरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा सर्व मार्गानी सुरू आहे. याची जाणीव पोेलिसांना आहे. पोलीस मात्र वाहनाने फेरफटका मारताना दिसतात. कारवाई मात्र थातूरमातूर होत असल्यामुळे महिलांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. पोलिसांचे खबरे, पोलीस पाटील, खुफीया कर्मचारी कार्यरत असतानाही दारू विक्री होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
या भागातून होते दारूतस्करी
तेलंगणा राज्यातील सिरपूर, कागजनगर, वाकंडी, आसिफाबाद, बैलमपल्ली, मंचेरियाल या भागातील परवानाधारक दुकानातील दारू तस्करीच्या माध्यमातून आणून विक्री सुरू आहे. तेलंगणातील ११० रुपयांची बॉटल २५० रुपयात बल्लारपूरात विक्री सुरू आहे व महाराष्ट्रातील १३० रुपयाची बॉटल (१८० मिली) ३०० रुपयात विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती पोलिसांना ठाऊक नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.