शूरवीरांची प्रेरणा घेऊन समाजाने पुढे जावे
By Admin | Updated: November 1, 2015 01:13 IST2015-11-01T01:13:07+5:302015-11-01T01:13:07+5:30
नाभिक समाजात आनंद रूपाली, जिवाजी महाले, भैय्याजी कोतवाल, सेना महाराज, नगाजी महाराज या सारख्या थोर व शुरविरांना जन्माला आलेत.

शूरवीरांची प्रेरणा घेऊन समाजाने पुढे जावे
हरीश ससनकर : भद्रावतीत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
भद्रावती : नाभिक समाजात आनंद रूपाली, जिवाजी महाले, भैय्याजी कोतवाल, सेना महाराज, नगाजी महाराज या सारख्या थोर व शुरविरांना जन्माला आलेत. अशा थोर व शूरविरांची प्रेरणा घेवून समाजाने पुढे जावे, असे आवाहन नाभिक समाज इतिहासतज्ज्ञ तथा जिवा महाले चित्रपटाचे पटकथा लेखक हरीश ससनकर यांनी शनिवारी येथे केले.
येथे आयोजित नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात आनंद रूपाली यांच्या कार्याला उजाळा देताना ते म्हणाले, आनंद रूपाली हा सामान्य न्हाव्याच्या कुटुंबात जन्मलेला मुलगा तो गौतम बुद्धाच्या पाच शिष्यांपैकी एक होता. ज्या काळात बुद्धाची परंपरा खंडीत झाली, त्यावेळी या रूपालीने आपले कौशल्य सिद्ध करून मोठमोठ्या पंडितांना पराभूत करून गौतम बुद्धाच्या मोठमोठ्या परिषदा भरवून देशातच नव्हे तर जगात बौद्ध धर्माचा प्रसार केला. याच समाजातील जीवा महालेने शिवाजी महाराजांचा अंगरक्षक बनून शूरता गाजविली होती, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व्ही.व्ही. किन्हीकर होते. कार्यक्रमाला सत्कारमूर्ती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी उपाध्यक्ष, नगरसेविका रेखा कुटेमाटे, दिनेश ऐकोणकर, विनोद वानखेडे, बापूराव जूनारकर, माया चिंचोलकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी आपल्या भाषणातून भद्रावती शहरातील विकासाला उजाळा दिला. ते म्हणाले, नगाजी महाराज मंदिराला नगरपरिषद निधीतून रक्कम दिली जाईल. समाज भवनाचे बांधकाम पूर्ण होत आहे. ज्या पद्धतीने हा समाज आमच्या पाठीशी आहे, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून मी स्वत: व या भागातील आमदार बाळू धानोरकर हेसुद्धा समाजाच्या पाठीशी आहेत. येथील खुल्या जागेवर बागेची निर्मिती करून सुशोभिकरण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दिनेश एकोणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी ओंकार वसंता दैवलकर, प्रगती विनोद बन्सोड यांचा सत्कार करण्यात आला तर विविध स्पर्धेत विजय झालेले प्रियंका नीलेश जुनारकर, उज्वला नागपूरे, ऋतुजा लांडगे, ज्ञानेश्वर आंबीलकर, रेखा लांडगे, सोनी निंबाळकर, नूपुर देवईकर, पूजा कोंगरे आदींचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन रोहिनी घुमे, काजल येसेकर यांनी तर प्रास्ताविक अंकुश दर्वे, आभार विजय मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन नक्षिणे, भावराव दैवलकर, अजय वाटेकर, नंदू नक्षिणे, प्रकाश दैवलकर, सुरेश जमदाडे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)