डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2015 01:58 IST2015-08-13T01:58:59+5:302015-08-13T01:58:59+5:30

ग्रामपंचायत निवडणूक काळात पिंपळगाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. वैद्यकीय चमू गावात दाखल होऊन तब्बल ११५ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन काहींचे रक्ताचे नमुने ...

The people of the dengue affected Pimpalgavya ignored the people's representatives | डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष


ब्रह्मपुरी : ग्रामपंचायत निवडणूक काळात पिंपळगाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. वैद्यकीय चमू गावात दाखल होऊन तब्बल ११५ रुग्णांची तपासणी करण्यात येऊन काहींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनी डेंग्यूग्रस्त पिंपळगाववासीयांची भेट घेतली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
तालुक्यातील नदीतिरावर वसलेल्या ब्रह्मपुरी शहरापासून सहा किमी अंतरावरील पिंपळगाव येथील तापाचे रुग्ण वडसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता गेले असता तपासणीअंती डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. ६ आॅगस्टला वडसा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी गजभिये यांना याची माहिती दिली. खात्री झाल्याने जिल्हा स्तरावरुन दखल घेत वैद्यकीय चमू पिंपळगावात दाखल झाली. दोन दिवस घरोघरी जाऊन रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन औषधोपचार करण्यात आला. काही रुग्ण पॉझीटीव्ह निघाल्याने नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली येथे हलविण्यात आले. तर काही रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र दोन-चार दिवसात गावात पुन्हा तापाची साथ पसरली असून वडसा, गडचिरोली तर काही रुग्ण ब्रह्मपुरी येथील डॉक्टराकडून उपचार घेत असल्याचे समजते. पिंपळगाव येथे भेट दिली असता गावात घाणीचे साम्राज्य असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. घरोघरी साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूची उत्पत्ती होते. त्यामुळे गावकऱ्यांनी स्वच्छता ठेवली व पाणी साठवून ठेवू नये, असे वैद्यकीय अधिकारी गजभिये यांनी सांगितले. शिवसेना तालुका प्रमुख अमृत नखाते यांनी गावातील तापाची साथ लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन गावात शिबिर लावण्याची मागणी केली असता पुन्हा एकदा मंगळवारी वैद्यकीय चमू दाखल झाली असून रुग्ण तपासणी शिबिर लागणार असल्याचे समजते. पिंपळगावात आतापर्यंत शेकडो गावकऱ्यांना तापाची लागण झाली असून २५ ते ३० रुग्ण डेंग्यूने प्रभावित झाले आहेत. पैकी पाच रुग्ण बरे होऊन घरी परत आले. दोन रुग्णांना नागपूरला पाठविण्यात आले आहे. तर काही रुग्ण ब्रह्मपुरी, वडसा, गडचिरोली व चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. पिंपळगावचा चिमूर विधानसभा क्षेत्रात समावेश होता. पंचायत समिती सदस्या स्वत: पिंपळगाव येथे वास्तव्यास आहेत. जिल्हा परिषद सदस्या पुष्पलता बुराडे नजीकच्या चिखलगाव येथे राहतात. मात्र त्यांनी गावकऱ्यांची अजूनही भेट घेतली नसल्याचे समजते.

Web Title: The people of the dengue affected Pimpalgavya ignored the people's representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.