निर्वाह भत्त्याची थकबाकी प्रलंबित
By Admin | Updated: May 13, 2017 00:39 IST2017-05-13T00:39:19+5:302017-05-13T00:39:19+5:30
वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर आगारातील वन कामगाराच्या निर्वाह भत्त्याची थकबाकी प्रलंबित असून ती तत्काळ देण्यात यावी, ....

निर्वाह भत्त्याची थकबाकी प्रलंबित
बल्लारपूर आगार : वनविकास महामंडळाचे कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर आगारातील वन कामगाराच्या निर्वाह भत्त्याची थकबाकी प्रलंबित असून ती तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी विदर्भ वन कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली आहे.
वनविकास महामंडळ बल्लारशा आगार विभागाअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांचा मेळावा मनीष चव्हाण यांच्या अध्यतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ वन कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहविडे व कामगार नेते बाबाराव मून उपस्थित होते.
यावेळी प्रा. दहीवडे म्हणाले की, कामगारांनी दीर्घकाळ संघर्ष करुन आपले बलीदान देऊन अधिकार मिळविले ते अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न भांडवलदारधार्जिण्या शासनाकडून होत आहे. कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याऐवजी कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल केला जात आहे. अल्पशा मजुरीवर काम करणाऱ्या वनमजुरांना गेल्या १० वर्र्षापासून निर्वाह भत्याची थकबाकी देण्यात आलेली नाही. ती तत्काळ देण्यात यावी अन्यथा आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करण्यात येईल. देशाचे सर्वोच्च न्यायालय म्हणते समान कामास समान वेतन देण्यात यावे. समान वेतन देण्याऐवजी काम असतानाही कामगारांना कामावरुन कमी करण्याचा सपाटा सुरु झाला आहे. तो तत्काळ बंद करावा, अशी मागणीही प्रा. दहिवडे यांनी केली.
प्रास्ताविक भाषणात बाबाराव मून म्हणाले की, कामगारांना त्यांच्या न्यायहक्कांपासून वंचित ठेवण्यासाठी ९० दिवस पूर्ण होताच काम असतानाही कामगारांना कामावरुन काढून टाका, असे कामगारविरोधी परिपत्रक असून ते तत्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. आभार प्रदर्शन नागेंद्र पाडाळे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्याकरिता आकाश मेश्राम, राजेश मानकर, सचिन उराडे, सुनील बरके, अरुण धकाते, मनोज बावणे, पराग कायरकर यांनी परिश्रम घेतले.