गोंडपिंपरीत तणावपूर्ण शांतता
By Admin | Updated: September 30, 2015 01:31 IST2015-09-30T01:31:07+5:302015-09-30T01:31:07+5:30
येथील बाजार मार्गावरील हनुमान मंदिरातील हनुमान व शिवलिंगाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी उघडकीस

गोंडपिंपरीत तणावपूर्ण शांतता
गोंडपिंपरी : येथील बाजार मार्गावरील हनुमान मंदिरातील हनुमान व शिवलिंगाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. त्यामुळे संतप्त झालेल्या गोंडपिपरीवासीयांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करून मुख्य मार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध केला. मूर्ती विटंबना प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून मंगळवारी शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली.
घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शहरात कडेकोट बंद पाळण्यात आला. त्यामुळे पोलिसांचा ताफा शहरात दाखल झाला. नागरिकांच्या तीव्र संवेदना सुरु असताना येथील पोलीस शिपाई मनोज धकाते याने दबंगगिरी दाखवत निषेध मोर्चातील एका कार्यकर्त्यांच्या हातून झेंडा हिसकावून पायाने तोडला. त्यामुळे नागरिक आणखी आक्रमक झाले.
ठाणेदार व पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यासाठी नागरिकांनी नारेबाजी केली. यादरम्यान आमदार अॅड. संजय धोटे यांनी मध्यस्थी केली होती. या प्रकरणाची दखल घेत मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी गोंडपिपरीचे ठाणेदार अर्जुन बोत्रे व इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. तर मूर्ती विटंबना प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी एकाला अटक केली असून अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने आपण गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सांगत आहेत. मात्र अटक करण्यात आलेला व्यक्ती आरोपी नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तणाव शांत करण्यासाठी पोलिसांचा हा डाव असून मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)