जीवनदायी उपचारासाठी रुग्णांना मनस्ताप

By Admin | Updated: October 18, 2014 23:23 IST2014-10-18T23:23:25+5:302014-10-18T23:23:25+5:30

गरीब गरजु नागरिकांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी योजना रुग्णांसाठी जीवनदायी नव्हे तर वेदनादायी ठरत आहे.

Patients suffer for life-saving treatment | जीवनदायी उपचारासाठी रुग्णांना मनस्ताप

जीवनदायी उपचारासाठी रुग्णांना मनस्ताप

टेमुर्डा : गरीब गरजु नागरिकांना विविध आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सुरू करण्यात आलेली राजीव गांधी जीवनदायी योजना रुग्णांसाठी जीवनदायी नव्हे तर वेदनादायी ठरत आहे. या योजनेचा लाभ घेताना रुग्णांना विविध अटीची पूर्तता करावी लागत असल्याने मरण यातना ही सहन कराव्या लागत आहे.
या योजनेंतर्गत राज्यभरात निवड झालेल्या कोणत्याही दवाखान्यात योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांवर उपचार केले जातात. जिल्ह्यातील अनेक दवाखान्यांत ही योजना सुरू आहे. शस्त्रक्रिया, औषधांसह विविध प्रकारचा खर्चाचा त्यामध्ये समावेश असतानाही दवाखान्याकडून शस्त्रक्रियेव्यतिरिक्त अनेक प्रकारचा खर्च दाखवून रुग्णांकडून पैसे उकळण्याचा उद्योग सुरू आहे. रुग्णाला मोठ्या आजाराची भीती दाखवून दवाखान्यात दाखल करून मोफत उपचार करणार असल्याचे सांगून शस्त्रक्रियेनंतर औषधे व विविध प्रकारच्या चाचण्यांचा खर्च दाखवून मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे. जीवनदायी योजनेतील सर्व काम आॅनलाईन चालते. ही योजना रुग्णांसाठी फायद्याची आहे. पण यात रुग्णांच्या आॅनलाईन नोंदणीत संबंधित रुग्णाच्या उपचारासाठीची रक्कम मान्य होईपर्यंतचा आॅनलाईनचा प्रवास इतका खडतर आहे की अनेक रुग्णांची नोंद होतच नाही. नशिबाने एखाद्या रुग्णाची नोंद झालीच तर रुग्णाच्या सर्व माहितीचा एक लांबलचक फॉर्म भरावा लागतो. तो पाठविल्यानंतर स्वीकारण्यासाठी किमान १८ तासांचा कालावधी उलटून जातो. गंभीर रुग्णांच्या उपचाराची हमी देणाऱ्या योजनेत वेळेचा एवढा अपव्यय कसा चालणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. योजनेची रचना गंभीर रुग्णांना योजनेचे गाजर दाखविल्यासारखी आहे की, नोंदणी करण्याचा फॉर्म इतका मोठा व सविस्तर आहे की, उपचार करणारा डॉक्टर सोडून तो कुणी भरूच शकत नाही. व्यवस्थापनासाठी मनुष्यबळ नेमूनही हे आॅनलाईन फॉर्म भरणे अशक्य आहे. त्यामुळे डॉक्टरने फार्म भरायचा की, उपचार करायचा हा प्रश्न आहे. त्यातच उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या बेडवर झोपलेला फोटो, रोज त्याच्या प्रकृतीचा तपशील, रुग्णालयातून जाताना त्याच्या हातात प्रवासाचे पैसे देतानाचे फोटो आदी निरर्थक बाबीच्या पूर्ततेच्या अटी टाकूनही योजना डॉक्टरांना राबविताच येऊ नये, अशी शासनाने पुरेपूर काळजी घेतली आहे, असे दिसून येत आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेचा शासनस्तरावर मोठा गवगवा होत असला तरी प्रत्यक्षात मात्र या योजनेतून उपचार घेण्यासाठी अप्रुव्हल मिळविणे डोकेदुखीच आहे. याच त्रासापाई डॉक्टर व हॉस्पिटलने जीवनदायी योजना राबविण्यास नकार दिला. अनेक रुग्णांची आर्थिक क्षमता नसताना डॉक्टर मानवी दृष्टिकोनातून रुग्णावर उपचार करीत आहे, असे डॉक्टर सांगतात. मात्र नेहमीच गरज असलेल्या रुग्णालाच जीवनदायीच्या लाभाचे अप्रुव्हल मिळत नाही. यामुळे बरेच रुग्ण व उपचार करणारा डॉक्टर हे दोघेही आर्थिक अडचणीत सापडतात. योजनेच्या लाभासाठी रुग्णांना आरोग्य कार्ड दिले आहेत. मात्र त्याचा उपयोग होतच नाही. लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड व रुग्णाचे ओळखपत्र आॅनलाईन नोंदणी करून घ्यावे लागते. ही नोंदणी झाल्यानंतर बरेच रुग्ण आपणास लाभ मिळणार असे समजून थेट रुग्णालयात दाखल होतात. तेव्हाच बऱ्याच रुग्णाची प्रकृती गंभीर असते. तेव्हा डॉक्टर याला जीवनदायीतून मंजुरी मिळणार की नाही, या विचाराच्या मानसिकतेत राहातच नाही. तेव्हा रुग्णाची आर्थिक क्षमता न पाहता मानवी दृष्टिकोनातून त्यांच्यावर उपचार केला जातो. तेव्हा प्रत्यक्षात जेव्हा अप्रुव्हलसाठी कागदपत्रे पाठवले जातात तेव्हा मंजुरी नाकारली जाते. अशा वेळी रुग्णावर झालेल्या उपचाराचा खर्च घ्यायचा कुणाकडून असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. शिवाय या योजनेतून संपुर्ण कुटुंबासाठी दीड लाख रुपयाची तरतूद केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Patients suffer for life-saving treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.