रुग्णांचे नातेवाईकच बनले सलाईन स्टॅन्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:58 IST2018-01-27T23:57:54+5:302018-01-27T23:58:15+5:30

रुग्णांचे नातेवाईकच बनले सलाईन स्टॅन्ड
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुविधांअभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने अनेकदा उघडकीस आणला. यानंतर वरिष्ठ पातळीवरून अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. मात्र, अधिकारी लक्ष द्यायला तयार नसल्याने रुग्णालयातील समस्या कायम आहेत. दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईकच चक्क सलाईन स्टॅन्ड बनल्याचे चित्र शनिवारी ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आहे. त्यामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर नामांतर झाले. यामुळे सुविधात वाढ होईल, अशी रुग्णांना अपेक्षा होती. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. मात्र, रुग्णांना सुविधा पुरविण्यात रुग्णालय प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे. रुग्णालयात खाटांची संख्या कमी असल्याने अनेकदा रूग्ण फरशीवर गादी टाकून उपचार घेताना दिसतात. तर शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत सलाईन स्टॅन्ड अभावी रुग्णांचे नातेवाईकच सलाईन हातात घेवून स्टॅन्डसारखे बेडजवळ उभे असल्याचे दिसून आले. याबाबत अधिक चौकशी केली असता, सलाईन स्टॅन्डच उपलब्ध नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून वरिष्ठ अधिकाºयांनी दखल घेवून रुग्णालयातील भोंगळ कारभार दूर करण्याची मागणी रुग्णांकडून होत होती.
अस्वच्छतेमुळे प्रचंड मनस्ताप
रूग्णालयातील अस्वच्छतेमुळे रूग्ण व नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खाटांअभावी अनेकदा खाली झोपून उपचार घ्यावे लागते. कधी तर मोकाट कुत्रे व जनावरांचाही येथे वावर दिसून येत असल्याने अस्वच्छता पसरली आहे.