घोसरी परिसरातील रुग्ण बोगस डॉक्टरांवर अवलंबून

By Admin | Updated: April 26, 2016 00:38 IST2016-04-26T00:38:48+5:302016-04-26T00:38:48+5:30

नवेगाव मोरे येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, सेविकांची पदनियुक्ती पाच वर्षांपासून रखडली असून ...

The patients in the Ghosari area are dependent on bogus doctors | घोसरी परिसरातील रुग्ण बोगस डॉक्टरांवर अवलंबून

घोसरी परिसरातील रुग्ण बोगस डॉक्टरांवर अवलंबून

नवेगाव मोरे केंद्र : घोसरी उपकेंद्रातील आरोग्य सेवेला ग्रहण
घोसरी : नवेगाव मोरे येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक, सेविकांची पदनियुक्ती पाच वर्षांपासून रखडली असून कार्यरत सेविका नियमितपणे कर्तव्य बजावत नसल्याने उपकेंद्र कुलूपबंद असते. गाव पातळीवर वेळीच प्राथमिक सेवा मिळत नसल्याने तक्रारवजा निवेदने देवून सुद्धा अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखविली नाही. त्यामुळे येथील आरोग्य सेवा बोगस डॉक्टरांवर अवलंबून आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे प्राथमिक केंद्रातर्गत
२६ गावांचे व्याप्त क्षेत्र असून घोसरी वेळवा, देवाडा(बुज), घाटकुळ व नवेगाव मोरे ही उपकेंद्र आहेत. केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी असून पोंभूर्णा येथील प्रभार दिले असल्याने रुग्ण सेवेला ग्रहण लागले आहे. भरीसभर घोसरी उपकेंद्रात आरोग्य सेवक व प्रसुती सेविकाची पदनियुक्ती करण्याचे सौजन्य संबंधितांनी दाखविली नसल्याने स्थानिकांना कमालिचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
घोसरी उपकेंद्र सद्य:स्थितीत रामभरोसे दिसत आहे. आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसून कर्तव्यात कसूर करीत असल्याने उपकेंद्र सतत कुलूपबंद असते. त्यामुळे मदतनीस घरकामात राहत असून साध्या तापाच्या गोळ्याचे वाटपसुद्धा केल्या जात नाही.
उपकेंद्रातील सेवा विस्कळीत राहत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अनेकदा तक्रारवजा निवेदने वरिष्ठांना दिलेली आहेत. परंतु या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली. जी सेविका कार्यरत राहत नाही, तिचे वेतन मात्र नियमित काढल्या जात आहे.
सद्य:स्थितीत उन्हाचा पारा चढलेला असून उष्णतेमुळे रुग्णांना जर्जर व्हावे लागत असताना उपकेंद्रात प्राथमिक सेवा मिळणे दुरापास्त झालेले आहे. परिणामी डॉक्टर आपल्या दारी म्हणून बोगस डॉक्टरांचे प्रस्थ परिसरात वाढीस आहेत. तापाने फणफणणाऱ्या रुग्णांना बोगस डाक्टरचा आधार दिसत असला तरी अचूक निदानाअभावीे अधिकचा आर्थिक भार पेलण्याची नामुष्की ओढावलेली आहे.
विशेषत: गरोदर मातांना उपकेंद्रात सुविधा देवून आर्थिक व शारीरिक .श्रम टाळण्याकरिता प्रसुती सेविकेची नियुक्ती आवश्यक आहे परंतु सेविकेचे पद रिक्त असल्याने नाईलाजास्तव इतरत्र रुग्णालयात संदर्भ सेवा दिल्या जात आहे. उपकेंद्रातील आरोग्य सेवेला संजीवनी देण्याकरिता वरिष्ठांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
या परिसरात शासकीय वैद्यकीय सेवाच नसल्याने बोगस डॉक्टर मोठ्या संख्येने सक्रीय झाले असून ते खासगी रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. याबाबत अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र वरिष्ठ पातळीवरून कोणतीही कारवाई न झाल्याने बोगस डॉक्टरांचे फावत आहे. (वार्ताहर)

Web Title: The patients in the Ghosari area are dependent on bogus doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.