ऑक्सिजनयुक्त खासगी रुग्णवाहिकेकडून रुग्णांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST2021-04-18T04:26:46+5:302021-04-18T04:26:46+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णांना हलविण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची गरज पडत आहे. शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्यास अनेकजण खासगी रुग्णवाहिकेचा वापर करतात. ...

ऑक्सिजनयुक्त खासगी रुग्णवाहिकेकडून रुग्णांची लूट
चंद्रपूर : कोरोना रुग्णांना हलविण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची गरज पडत आहे. शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्यास अनेकजण खासगी रुग्णवाहिकेचा वापर करतात. मात्र या खासगी रुग्णवाहिकेकडून रुग्णांची वारेमाप लूट करीत असल्याचे चित्र आहे.
रुग्णांना वेळेवर शहराच्या ठिकाणी हलविता यावे, यासाठी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षातर्फे माफक दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. जिल्ह्यात साधारणत: १५४ खासगी रुग्णवाहिका आहेत. तर शासनाच्या १०८ च्या ३२ रुग्णवाहिका ऑक्सिजनयुक्त व सर्व सोईसुविधायुक्त आहेत. तर १०२ क्रमांकाच्या ५८ रुग्णवाहिका आहेत. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांना हलविण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची गरज भासते. शासकीय रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यास अनेकजण खासगी रुग्णवाहिकांशी संपर्क साधतात. याच संधीचा फायदा घेत खासगी रुग्णवाहिकांकडून वारेमार दर घेतात. प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी रुग्णवाहिकेसाठी दर आखून दिले आहेत. मात्र रुग्णवाहिकेचे मालक या दराच्या कितीतरी पटीने अधिक दर आखत असल्याची माहिती आहे.
बॉक्स
तक्रार कुठे करायची
खासगी रुग्णवाहिकांकडून जास्तीचे भाडे आकारल्यास कोरोना रुग्ण व नातेवाइकांना उपप्रादेशिक परिवहन आधिकारी कार्यालयाकडे पावतीसह लेखी तक्रार करता येते. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत केवळ दंडात्मक कार्यवाही या कार्यालयाकडून रुग्णवाहिका मालकांविरुद्ध करण्यात येते.
बॉक्स
असे आहेत दर
खासगी रुग्णवाहिकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातर्फे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. मारुती व्हॅन रुग्णवाहिका असल्यास २५ किमी अथवा दोन तासाकरिता ६०० रुपये व त्याव्यतिरिक्त अधिक किमीचा प्रवास असल्यास १२ रुपये पर किमी, टाटा सुमो व मेटॅडोर २५ किमी अथवा दोन तासांकरिता ७०० रुपये व त्याव्यतिरिक्त अधिक किमीचा प्रवास असल्यास १२ रुपये पर किमी, आयसीयू अथवा वातानुकूलित वाहने २५ किमी अथवा दोन तासांकरिता १००० रुपये व त्याव्यतिरिक्त अधिक किमीचा प्रवास असल्यास २२ रुपये पर किमी रुपये आकारण्यात येत आहे.
कोट
रुग्णवाहिकेला ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकरण्यात येत असल्यास तशी तक्रार करावी, सत्यता आढळल्यास कारवाई करण्यात येईल. एमएच ३४ ॲट महाट्रान्सकॉम डॉट ईन या ईमेलवर तक्रार करता येते. तक्रारीत रुग्णवाहिकेने नेलेला मार्ग, नाव नमूद असणे गरजेचे आहे.
- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी