खिशात पास, तरीही विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
By Admin | Updated: July 17, 2017 00:33 IST2017-07-17T00:33:00+5:302017-07-17T00:33:00+5:30
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणे सोपे जावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्या सुरू केल्या आहेत.

खिशात पास, तरीही विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
डोळेझाक
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन शिक्षण घेणे सोपे जावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र या बसगाड्यांमध्ये प्रवाशांचीच जास्त वाहतूक केली जात असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांनाच सीट मिळत नाही. सीट न मिळाल्याने दरवाज्यावर उभी असलेली विद्यार्थिनी धावत्या बसमधून खाली पडल्याची घटना मागील आठवड्यात गांगलवाडी येथे घडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून ‘खिशात पास तरीही जीवघेणा प्रवास’ अशी धोकादायक स्थिती ग्रामीण भागात दिसून येत आहे.
कोरपना तालुक्यातील कोडशी (बु), येरगव्हान, पिपरी, कोठोडा (बु), कारगाव, सावलहिरा, जांभूळधरा, मांडवा, गोविंदपूर, बोरी (नवेगाव), इरई आदी गावांसाठी बससेवा नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पायी किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. गडचांदूर येथे अनेक शाळा-महाविद्यालय असल्याने विविध भागातून शेकडो विद्यार्थी व विद्यार्र्थिंनी बसने प्रवास करतात. मात्र एसटी महामंडळाच्या बसेस वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत उशीरा पोहोचतात. यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. भद्रावती तालुक्यातील ३६ गावांमध्ये अजूनही बससेवा पोहोचली नाही. याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ७ किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. तालुक्यातील गोरजा, कुडरारा, देऊळवाडा, कुनाडा, चिरादेवी, चारू (ख), किन्हाळा, पारोधी, पळसगाव या गावातील विद्यार्थी दररोज पायदळ प्रवास करून शाळेत जातात.
चिमूर तालुक्यात मानव विकास अंतर्गत ५७ गावांचा समावेश तर सिंदेवाही तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यासाठी चिमूर आगारातून १४ बस मधून दिवसाला ७१ फे ऱ्यात २ हजार १७६ किलोमीटरची विद्यार्थी वाहतूक केली जाते. मात्र शाळा सुटल्यानंतर सीट पकडण्यासाठी विद्यार्थांची झुंबड उडत असते. तेव्हा अपघात होण्याची शक्यता असते. तर तालुक्यातील खंडाळा, झरी, बोडधा, हेटी, टाका, चिचोली, पिंपळगाव, मोटेपार बाघेड, काग, लोहारा, जारेपार, या गावात बससेवा नसल्याने विद्यार्थांना सायकल किंवा इतर साधनांद्वारे शाळेत जावे लागते.
ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी आक्सापूर, चांद्रा, डोर्ली, चिचगाव, बारडकिन्ही आदी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कसरत करावी लागते. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणाकरिता ब्रह्मपूरी, गांगलवाडी, निलज, रूई व आरमोरी यासारख्या ठिकाणी विद्यार्थी जातात. मात्र वेळेवर बससेवा उपलब्ध नाही. जेथे बससेवा आहे तेथे विद्यार्थ्यांना कोंबून बसविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जादा बसगाडीची मागणी आहे.
मूल तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पडझरी येथील इयत्ता पहिली ते पाचवीच्या २० विद्यार्थ्यांना ३ किमीचा प्रवास जंगलातून पायी करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना नेहमीच वन्यप्राण्यांची भिती असते. सावली तालुक्यातील करोली, आकापूर हे दोन्ही गावे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून या दोन्ही गावात आजपर्यंत बससेवा सुरू होवू शकली नाही. या गावातील ३० ते ४० विद्यार्थी इयत्ता ५ ते १२ वी पर्यंत शिक्षणासाठी विहीरगांव येथे जातात. मात्र त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील विद्यार्थी चंद्रपुरात शिक्षणासाठी येतात. मात्र शाळेच्या वेळेत सुटणाऱ्या बसमध्ये इतर प्रवाशांचीच गर्दी राहत असल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गर्दीमुळे विद्यार्थ्यांचा श्वास गुदमरल्याच्याही घटना घडल्या आहेत. बस आल्यानंतर अनेक विद्यार्थी सीट पकडण्यासाठी खिडकीतून दफ्तर टाकतात. अशावेळीही अपघात घडले आहेत.