बसथांब्याअभावी प्रवाशांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST2021-01-14T04:22:51+5:302021-01-14T04:22:51+5:30
चंद्रपूर : शहरातून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शहरातील मुख्य चौकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष ...

बसथांब्याअभावी प्रवाशांची अडचण
चंद्रपूर : शहरातून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शहरातील मुख्य चौकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे वाहतूक निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनामुळे बंद केलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्यापही बंद आहेत. परिणामी शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांची मोठी पंचाईत होत आहे. तसेच चंद्रपूर शहरातील मुख्य चौकातही बस थांबत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून राजुरा-बल्लारपूर-ऊर्जानगर बस सुरू करून बागलानगर, अंचलेश्वर गेट, गांधी चौक, आझाद गार्ड, जटपुरा गेट, बसस्थानक, तुकूम, दुर्गापूर, शक्तिनगर येथे थांबे देण्यात यावेत; तसेच चंद्रपूरवरून मूलकडे धावणाऱ्या बसला बंगाली कॅम्प, इंदिरानगर, कृष्णनगर, एमईएल येथे तर नागपूरकडे जणाऱ्या बसचे पाण्याची टाकी, जनता कॉलेज बापटनगर, ट्रायस्टार हॉटेलजवळ थांबा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी ‘बीबीएसएस’चे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधळा, अश्विनी खोब्रागडे, वनश्री मेश्राम, संजीवनी कुबेर, तरन्नुम मलिक, सुबोध कासूलकर, जितेंद्र चोरडिया, मल्लक शकीर, शिशिर हलदर, दिनेश जुमडे, विलास माथनकर, आदी उपस्थित होते.