२ सप्टेंबरच्या संपात सहभागी व्हा
By Admin | Updated: August 6, 2016 00:42 IST2016-08-06T00:42:00+5:302016-08-06T00:42:00+5:30
विविध केंद्रीय कामगार संघटनांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ २ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

२ सप्टेंबरच्या संपात सहभागी व्हा
आंगणवाडी महिला मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचे आवाहन
सावली : विविध केंद्रीय कामगार संघटनांनी मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ २ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. हा संप सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी आणि त्या दिवशीच्या लढाऊ आंदोलनात अधिकाधिक श्रमिकांना रस्त्यावर उतरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केले.
आंगणवाडी महिलांचा मेळावा शालू वरेटवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहिवडे व बाबाराव मून उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात शोभा बोगावार म्हणाल्या की, सतत वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. अल्पसे मानधन आणि तेदेखील तीन-तीन महिने मिळत नाही. दोन वर्षांचा कार्यकाळ लोटून मानधन वाढीची थकबाकी देण्यात आलेली नाही. काही आंगणवाडीसेविका सेवानिवृत्त झाल्या आहेत. तर काही मरण पावल्या. त्यांना एक लाख व मदतनीसांना ७५ हजार रुपये कोणालाही देण्यात आले नाहीत. बाबाराव मून यांनीही केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.
मेळावा यशस्वी करण्याकरिता शिला रोहणकर, प्रभा मेश्राम, अल्का मेंढे, दिप्ती मेश्राम, बेबी लोणबले, सुशिला मंगर, सिंधू आसमवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)