पऱ्हाटी, सोयाबीनची पेरणी थांबली

By Admin | Updated: June 20, 2017 00:25 IST2017-06-20T00:25:51+5:302017-06-20T00:25:51+5:30

जिल्ह्यात पेरणी केलेल्या बियाण्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. कापसाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज असून शेतकरी पुरेशा पावसाची वाट पाहात आहेत.

Parathya, soya bean sowing stopped | पऱ्हाटी, सोयाबीनची पेरणी थांबली

पऱ्हाटी, सोयाबीनची पेरणी थांबली

आभाळाकडे डोळे : शेतातील बियाणे करपण्याच्या मार्गावर, तीन दिवसांत पावसाची आवश्यकता
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात पेरणी केलेल्या बियाण्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. कापसाची १७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज असून शेतकरी पुरेशा पावसाची वाट पाहात आहेत. २-३ दिवसांत पाऊस येण्याची गरज आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी पऱ्हाटी व सोयाबीनची पेरणी थांबविली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या एक-दोन पावसांत पऱ्हाटीची पेरणी केली आहे. तसेच त्यांनी डीएपी खतदेखील टाकले आहे. परंतु पावसाचा पत्ता नाही. राजुरा, कोरपना, जिवती तालुक्यात करण्यात आलेली धूळपेरणी जुगार ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने केलेले पेरणीचे नियोजन कोलमडले आहे.
विदर्भात ७ जूनपासून मान्सूनला सुरुवात होत असते. परंतु यावर्षी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. पऱ्हाटीच्या पेरणीसाठी ५० ते २५० मिमी पावसाची आवश्यकता असते. २५० मिमी पाऊस पडल्यावर कपाशीची पेरणी केली असल्यास त्याची उगवण चांगली होत असते. ते पीक किडीच्या प्रादुर्भावात येत नाही. सोयाबीनसाठीदेखील दमदार पावसाची गरज असते. त्यामुळे सोयाबीनची लागवड १५ जुलैपर्यंत केली जाते. पीक लागवडीचा कालावधी आणि पीक हाती येण्याचा कालावधी लक्षात घेता कापूस उत्पादन शेतकऱ्यांनी हात रोखून धरला आहे. ते चांगल्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात वरोरा, भद्रावती, राजुरा भागाच्या काही पट्ट्यामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पऱ्हाटी, सोयाबीनची पेरणी केली आहे. पोंभुर्णा, कोरपनाच्या काही भागात धानाचे पऱ्हे टाकण्यात आले. त्यानंतर पाऊस गायब झाला आहे. दररोज कडक व लख्ख उन्ह पडत आहे. आकाशात ढग जमा होतात. ते ढग तास-दोन तासांनंतर नाहीसे होत आहेत. ढगातून पाऊस येत नसल्याचे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे यांनी पुरेशा पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यातून बियाणांवर खर्च होणारा पैसा व वेळेची बचत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कपाशीवरून सोयाबीनकडे वळण्याची शक्यता
कपाशी पीक हाती येण्याचा कालावधी १६० ते १८० दिवसांचा असतो. त्यामुळे अनेक शेतकरी धूळपेरणी करीत असतात. तर बहुसंख्य शेतकरी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पऱ्हाटीची पेरणी करतात. जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस येणार नसेल तर काय करायचे, याबाबत काही शेतकरी नियोजन करीत आहेत. त्याकरिता अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्राकडे सोयाबीन बियाणांचे बुकींग सुरू केले आहे. सोयाबीनचा पेरा घटत असल्याची बाब लक्षात घेऊन अनेक विक्रेत्यांनी सोयाबीन बियाणे कमीच ठेवलेले आहेत. परंतु शेतकऱ्यांनी मागणी नोंदविल्यानंतर आता हे विक्रेते सोयाबीन बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करीत आहेत.
शेतकरी चिंताग्रस्त
पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. भारतीय हवामान खात्याने ९८ टक्के पाऊस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याच वेळी जापानच्या हवामान केंद्राने यावर्षी भारतातील पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे मे महिन्यात म्हटले होते. ही बाब लक्षात घेतल्यास सध्या उद्भवलेली पावसाची परिस्थिती खरी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची केलेली पेरणी चिंता वाढविणारी आहे.
केवळ १७ टक्के पेरणी
खरीप हंगामात कृषी विभागाने जिल्ह्यात कापसाची पेरणी १ लाख ६९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात होण्याचे नियोजन केले आहे. तुरीचे नियोजन ३९ हजार १०० हेक्टर क्षेत्राचे आहे. प्रत्यक्षात १९ जूनपर्यंत पऱ्हाटी ३० हजार ५६५ हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. तर तूर ३ हजार ५६२ हेक्टरमध्ये पेरण्यात आली आहे. नियोजनाच्या तुलनेत कापसाची पेरणी केवळ १७ टक्के झाली असून तुरीचे प्रमाण ५ टक्के आहे.

मातीच्या खाली बियाणे आणि वर डीएपी
दाताळा, देवाळा आदी भागातील शेतांना भेटी दिल्या असता शेतकऱ्यांनी पऱ्हाटीची पेरणी केली असल्याचे आढळले. एक-दोन पावसानंतर ही पेरणी करण्यात आली. तर काही शेतकऱ्यांनी दोन-तीन दिवसांत पाऊस येईल, या आशेवर पेरणी केली आहे. जमीन ओली झाल्यानंतर पेरणी केली असल्याने कपाशीची बियाणे मातीखाली गेली आहेत. त्याच्या संवर्धनासाठी या शेतकऱ्यांनी डी.ए.पी. खत टाकले आहे. त्यानंतरही पऱ्हाटीचे झाड उगविणार अथवा नाही, याची चिंता लागली आहे.

पाऊस येईल, या आशेवर दोन दिवसांपूर्वी तीन एकरांमध्ये कपाशी बियाण्यांची पेरणी केली आहे. ते बियाणे पाऊस आल्यावर उगवण्याची शक्यता आहे. त्याकरिता डी.ए.पी. खतदेखील टाकले आहे. पेरणी केली असली तरी पाऊस येईलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे बियाणे उगवतीलच, हेदेखील सांगणे कठीण आहे.
- विनोद मांडवकर, शेतकरी,
दाताळा, जि. चंद्रपूर

Web Title: Parathya, soya bean sowing stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.