रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ग्राफपेपर पुरविलाच नाही
By Admin | Updated: April 19, 2015 01:12 IST2015-04-19T01:12:42+5:302015-04-19T01:12:42+5:30
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने आज रसायनशास्त्र भाग दोनचा पेपर घेण्यात आला.

रसायनशास्त्राच्या पेपरमध्ये ग्राफपेपर पुरविलाच नाही
वरोरा : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने आज रसायनशास्त्र भाग दोनचा पेपर घेण्यात आला. प्रश्नपत्रिकेमध्ये साडेसात गुणांचा प्रश्न ग्राफ पेपरवर सोडविण्याकरिता विचारण्यात आला होता. परंतु परीक्षार्थ्यांना ग्राफपेपर उत्तर पत्रिकेसोबत देण्यातच आला नाही. त्यामुळे परीक्षार्थी त्या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकले नाही. शेकडो परीक्षार्थी साडेसात गुणांपासून वंचित झाले आहे. या प्रकारामुळे परीक्षार्थ्यांमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने सेमीस्टर दोनमधील आज शनिवारी सर्वच केंद्रावर रसायनशास्त्र भाग दोनचा पेपर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात आला. रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक एक मधील ए मध्ये पाच गुणांचा प्रश्न ग्रॉफपेपरवर आधारित तर प्रश्न क्र. १ मधील सी क्रमांकाचा अडीच गुणाचा प्रश्न लाँग टेबलवर आधारित विचारण्यात आला. प्रश्नपत्रिका हाती पडताच विद्यार्थ्यांची कुजबुज परीक्षा केंद्रावर सुरू झाली. एकमेकांना परीक्षार्थी लाँग टेबल व ग्रॉफ पेपरबाबत खुणावू लागले. ही कुजबुज रूममध्ये असणाऱ्या पर्यवेक्षकाकडे जाताच त्यांनी सखोल चौकशी करून काही परीक्षार्थ्यांना विचारणा केली असता प्रश्न पत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न ग्राफपेपर व लाँग टेबलशिवाय सोडवू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर ही बाब परीक्षा प्रमुख यांच्या कानावर टाकण्यात आल्याने धावपळ सुरू झाली. परंतु विद्यापिठाने ग्राफ पेपर व लाँग टेबल हे साहित्य पुरविण्याच्या कुठल्याही सूचना दिल्या नाही व प्रश्नपत्रिकेसोबतही पुरविण्यात आले नाही. त्यामुळे परीक्षेचा तीन तासांचा कालावधी लोटूनही ते विद्यार्थ्यांच्या हाती पडले नसल्याने परीक्षार्थी साडेसात गुणांपासून वंचित राहिले. गोंडवाना विद्यापिठातील भोंगळ कारभार मागील काही दिवसांपासून अनेकदा समोर आला आहे. आज ग्राफ पेपर व लाँग टेबलवर आधारित प्रश्न विचारून त्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे विद्यापिठाने परत आपला भोंगळ कारभार विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे. (तालुका प्रतिनिधी)