पेपर मिलचे युवा कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात

By Admin | Updated: November 8, 2016 00:58 IST2016-11-08T00:58:18+5:302016-11-08T00:58:18+5:30

येथील बल्लारपूर पेपर मिलची स्थिती कधी चालू, कधी बंद अशी बेभरोशाची होऊन बसली आहे.

Paper Mill's young staff in search of a new job | पेपर मिलचे युवा कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात

पेपर मिलचे युवा कर्मचारी नव्या नोकरीच्या शोधात

बल्लारपूर : येथील बल्लारपूर पेपर मिलची स्थिती कधी चालू, कधी बंद अशी बेभरोशाची होऊन बसली आहे. या मिलमध्ये कामगारांचे नियमित जाणे व आपली ड्युटी बजावणे सुरू आहे. मात्र, पेपर उत्पादन जवळपास बंद आहे. दिवाळीपूर्वी उत्पादन सुरू झाले होते. ते परत बंद झाले. आर्थिक अडचण आणि कच्चा माल असलेल्या बांबूचा अभाव ही कारणे सांगितली जातात. अशाप्रकारे गेल्या पाच- सहा महिन्यांपासून या मिलची वाईट स्थिती सुरू आहे. तीन महिन्यांचे पगारही अडून पडले आहेत. दिवाळीनिमित्त वार्षिक बोनसची काही रक्कम देण्यात आली, एवढेच!
या सर्व कारणांपायी पेपर मिलचे भवितव्य आणि मिलमधील कर्मचाऱ्यांना आपली नोकरी राहणार की जाणार, अशा असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासले आहे. या मिलमध्ये नियमित, रोजंदारी व ठेकेदारी अशा वर्गवारीचे कर्मचारी आहेत. नियमित कामगारांना प्रतिदिन हाजरी मिळत आहे. तर ठेकेदारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड हाजरी दिली जात आहे. या कारणाने, ठेकेदारी कर्मचाऱ्यांना असुरक्षतेची भावना अधिक त्रासून सोडत आहे. त्यामुळे ठेकेदारीतील काही शिक्षित पदवीधर युवा कर्मचारी नवीन ठिकाणी नोकरीचा शोध घेत आहेत. वाढलेल्या वयामुळे ज्यांना नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता दिसत नाही, त्यांना असा पर्याय नाही. परंतु २० - ३० वर्षे वय असलेले तरुण मात्र नवीन नोकरीच्या शोधात भटकत आहेत. त्यांच्या पुणे, हैद्राबाद, मुंबई इत्यादी ठिकाणी फेऱ्या मारणे सुरू आहे. काहींना त्यात यशही मिळत असल्याचे सांगितल्या जाते. (तालुका प्रतिनिधी)

चैतन्य हरपले
पेपर मिलच्या या अशा वाईट स्थिती पायी पेपर मिल भागातील चैतन्यच हरपले आहे. पगार होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक टंचाईत दिवस जात आहेत. त्या परिसरातील लहान-मोठ्या विविध प्रकारच्या व्यापाराला अवकळा आली आहे. त्याची बरीचशी झळ शहरातील मुख्य बाजारपेठेलाही बसत आहे. बल्लारपूर पेपर मिल म्हणजे या शहराची वाहिनी असल्याने शहरासह तालुक्यातील बाजारपेठेचे अर्थचक्रच आता मंदावल्यासारखे दिसत आहे.

Web Title: Paper Mill's young staff in search of a new job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.