पेपर मिलच्या ठेकेदारी कामगाराला मारहाण
By Admin | Updated: October 21, 2015 01:03 IST2015-10-21T01:03:54+5:302015-10-21T01:03:54+5:30
येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायी संजय ढेंगर व त्याच्या दोन भावडांनी स्थानिक बल्लारपूर पेपर मिलच्या आत एका ठेकेदारी कामगाराला मारहाण केली.

पेपर मिलच्या ठेकेदारी कामगाराला मारहाण
बल्लारपूर : येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायी संजय ढेंगर व त्याच्या दोन भावडांनी स्थानिक बल्लारपूर पेपर मिलच्या आत एका ठेकेदारी कामगाराला मारहाण केली. यात तो कामगार जखमी झाला आहे. ही घटना सोमवारच्या रात्री पेपर मिल चिप्पर विभागात घडली.
कामगाराच्या तक्रारीवरुन संजय ढेंगर याला पोलिसांनी अटक केली असून दोघे फरार आहेत. संजय ढेंगर यांचा ट्रक पेपर मिलामध्ये चालते. संजय ढेंगर हे रात्री ११ वाजता पेपर मिलामध्ये जावून तेथे रात्र पाळीवर असलेल्या रणजितसिंह तरसेमसिंग लिद्दड (३५) याला तुझा मालक कुठे आहे, अशी विचारणा करून त्याला शिवीगाळ केली व धमकीही दिली. रणजितसिंग ने तत्काळ पोलिसात जावून ढेंगर याच्या विरोधात तशी तक्रार देऊन तो परत कामावर गेला. यानंतर संजय ढेंगर, राजू ढेंगर आणि मोनू ढेंगर हे परत रात्री अडीच वाजता पेपर मिलच्या आत जावून रणजितसिंगला मारहाण करुन चाकूने जखमी केले. यावरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे फरार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
रमाई घरकूल अनुदानात वाढ करा
चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोठारी येथे सन २०११-१२ या वर्षात रमाई घरकूल योजने अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांना घरकूल रक्कम म्हणून ६८ हजार रुपये देण्यात आले होते. परंतु सदर रक्कम ही अतिशय कमी असल्यामुळे लाभार्थ्यांच्या घरांचे प्लॉस्टर, फ्लोरिंग, फरची, कोपिंग, पारापेट व शौचालय इत्यादी बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या अनुदानात वाढ करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. लाभार्थ्यांच्या घरची परिस्थिती अतिशय नाजुक व हलाखीची आहे. रोजीरोटी करुन सर्वजण आपले जीवन जगतात. आर्थिक बाजुने सक्षम नाही. त्यामुळे रखडलेले काम पूर्ण करणे शक्य नाही. कोठारी येथील सर्व लाभार्थी शासनाच्या वाढीव निधीची प्रतीक्षा गेल्या दोन वर्षापासून करीत आहेत. मात्र शासनाने त्यांना अजूनपर्यंत कुठलाही वाढीव निधी उपलब्ध करून दिला नाही. (स्थानिक प्रतिनिधी)