पल्लेझरी येथील मजुरांचा उपोषणाचा इशारा
By Admin | Updated: December 4, 2014 23:06 IST2014-12-04T23:06:21+5:302014-12-04T23:06:21+5:30
तालुक्यातील पल्लेझरी येथील मजुरांना मागील एक वर्षापासून मजुरी न मिळाल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. मजुरी मिळावी यासाठी अनेक वेळा संबंधित कार्यालयाचे दारे ठोठावली.

पल्लेझरी येथील मजुरांचा उपोषणाचा इशारा
जिवती : तालुक्यातील पल्लेझरी येथील मजुरांना मागील एक वर्षापासून मजुरी न मिळाल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. मजुरी मिळावी यासाठी अनेक वेळा संबंधित कार्यालयाचे दारे ठोठावली. मात्र कुणीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही .त्यामुळे संबंधित कामावरील मजुरांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.
ग्रामपंचायत मरकागोंदी अंतर्गत येणाऱ्या माथाडी व पल्लेझरी गावात शेतकऱ्यांना शेतात जाण्यास सोयीचे व्हावे, यासाठी रोजगार हमी योजनेतून पांदन रस्ते तयार करण्यात आले. यात अनेक मजुरांनी काम केले.
मात्र वर्षभरापासून मजुरांना मजुरी मिळाली नाही. शासन नियमानुसार रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांना सहा दिवसात मजुरी देण्याचे आदेश आहेत. असे असतानाही संबंधित अधिकारी त्याकडे डोळेझाक करीत आहे. त्याच काळात कामावर देखरेखीसाठी ठेवलेल्या रोजगार सेवकाचे अचानक निधन झाले.
रोजगार सेवकांनी कामाचे मोजमाप करुन घेतले होते. पण त्यांचे मुल्यांकन केले नाही. आजपर्यंत मजुरी काढून देतो म्हणणारे अधिकारी आज हात वर करुन मजुरी मिळत नाही, असे बेजबाबदारपणे बोलू लागल्याने मजुरांना अखेर उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला आहे.
तात्काळ मजुरी न दिल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)